विरपिता शशिकांत कदम यांना अखेरचा निरोप…
… मला आठवत, कारगील युद्ध सुरू होत… आणि या युद्धात पडवे येथील कदम दांपत्याचा एकुलता एक मुलगा ले. कर्नल मनीष कदम आणि स्नुषा कॅप्टन डॉ. स्मिता कदम हे दोघेही पती-पत्नी कारगिलच्या मोहीमेवर होते. त्यामुळे साहजिकच आईवडील चिंतेत होते… अशा आशयाची बातमी पेपरमध्ये छापून आली. ही बातमी ऐकून मी तात्काळ तत्कालीन जिल्हा सैनिकी अधिकारी ढोरजकर साहेबांना फोन लावला. तसे ते माझे चांगले मित्र होते. त्यांच्याकडून पडवे येथील कदम दांपत्याचा तपशील घेतला आणि मी त्यांना भेटायला गेलो.
एका बाजूला आपला एकुलता एक मुलगा देशासाठी सिमेवर लढतो आहे याचा त्यांना सार्थ अभिमान होता. स्व. शुभदा काकू तर मनीषच्या लहानपणीच्या गोष्टी मला तल्लीन होवून सांगत होत्या… तरीही त्यांच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती. अशावेळी मानसिक आधार देण्या पलीकडे आपण काहीच करू शकत नव्हतो.मी ठरवलं की यांच्या बरोबर आपण सातत्याने संवाद ठेवायचा… आणि इथूनच या राष्ट्रभक्त कुटुंबाशी जोडले गेलो. त्याचवेळी सावंतवाडीत या दांपत्याला आमंत्रित करुन १५आॅगस्टला त्यांच्या प्रमुख उपस्थितीत देशभक्तीपर कार्यक्रम आयोजित केला. हळूहळू येणजाणं वाढल आणि कौटुंबिक संबंध एवढे घट्ट झाले… कि माझ्यावर त्यांनी मुलासारखं प्रेम केल.
हळूहळू कारगिल युद्ध थांबल.. तत्कालीन पंतप्रधान भारतरत्न अटलजी यांनी विजयदिन घोषित केला. कारगिल मोहीमेवर असणारे मनिष कदम आपल्या गावी पडव्याला आले. एकेदिवशी दुपारी कदम काका मनीषना घेऊन माझ्या माजगावच्या घरी आले. मी एकटाच घरी होतो. मी दोघांनाही चहा करून दिला. सुमारे तासभर गप्पा झाल्या. कारगिल युद्धाचा अनुभव त्यांनी सांगितला. मग आम्ही तिघेही साधले मेसमध्ये जेवायला गेलो… ही मनीषची आणि माझी पहिली भेट…
शुभदा काकु या मुंबईच्या शाळेतून आर्ट टिचर म्हणून निवृत्त झालेल्या. कदम काकानीही नोकरी सोडलेली. त्याना पर्यटनात विशेष आवड असल्याने त्यांनी पडव्याला श्रीयोग पर्यटन निवास व न्याहारी हे केंद्र सुरू करण्याचं ठरवलं. अवघ्या दोन वर्षात त्यांनी त्याची उभारणी केली. तेव्हा मा. सुरेशजी प्रभू हे देशाचे उर्जा मंञी होते. मला काका म्हणाले “नकुल आपल्या या नवीन प्रकल्पाच्या उदघाटनाला प्रभू साहेब येतील का”? मी म्हणालो'” बघू , विनंती करूया”.. मी साहेबांना फोन लावला आणि आमच्या लाडक्या साहेबांनी होकारही दिला.. २००४ला मा. प्रभू साहेबांच्या शुभहस्ते कदम कांकाच्या श्रीयोग पर्यटन केंद्राचे मोठ्या उत्साहात उदघाटन झालं. ज्या कार्यक्रमात आमच्या छोट्या स्नेहलने गणेश नृत्य केलं होत. काकांनी तिला विशेष बक्षिस देवून गौरविले होते.
शुभदा काकू आणि काका या व्यवसायात रमले होते… दिवसामागून दिवस जात होते आणि दुर्दैवाने काळाने घाला घातला १६ मार्च २००८ रोजी बारामुल्ला जिल्ह्यात अतिरेक्यांशी दोन हात करत असताना भारत मातेचा हा शुरपुञ शहिद झाला. मनीषच्या पश्चात सैन्यामध्येच कार्यरत असलेली त्याची पत्नी कॅप्टन डॉ स्मिता, त्यावेळी अवघा चार वर्षाचा असलेला मुलगा सिद्धांत आणि म्हातारे आईवडील यांना सोडून मनिष अशा प्रवासाला गेला… कि कधीही परत न येण्यासाठी…
१९ मार्च २००८ सरकारी इतमामाने आणि साश्रुनयनांनी हजारोंच्या साक्षीने सरंबळ या त्यांच्या गावी अखेरचा निरोप दिला… तेव्हा माझ्याशी बोलताना कदम काका म्हणाले होते, “हे आम्हा माता पित्यांचे दु:ख पर्वताएवढे आहे, पण आम्हाला ते आता सहन केलेचं पाहिजे. कारण माझा एकुलता एक मुलगा देशासाठी शहीद झाला… याचा मला अभिमान आहे”…
हे दु:ख पचवत त्यांनी पुढचा प्रवास सुरू केला.. २००९च्या जानेवारीत ते माझ्या घरी वस्तीला आले.. मला म्हणाले” मनीषच्या नांवाने मला एका फाउंडेशनची स्थापना करायची आहे आणि ही जबाबदारी तुम्ही घ्यायची आहे “.. काकांना मी नकार देवूच शकत नव्हतो… त्याचराञी त्यांनी काही नांव सुचवली.. ज्यात आदरणीय प्रभू साहेब, श्री प्रमोद जठार, श्री शेखर सामंत, डॉ. राहुल पंतवालावरकर, मोहन होडावडेकर, प्रा. विलास सावंत अशांची फोनवर संमती घेऊन शहिद ले. कर्नल मनिष कदम फाऊंडेशनची स्थापना झाली. या फाऊंडेशनच्या वतीने अनेक उपक्रम राबवले. त्याचवेळी त्यांनी असा घडला सेनानी… हे मनीषच्या संपूर्ण जीवन प्रवासाची माहिती देणार पुस्तक लिहिले… त्याची हिंदी आवृत्तीही निघाली. माझ्या आवडीचा हा विषय असल्याने व तोआपल्या जिल्ह्यातील लोकांसमोर गेला पाहिजे.कोकणच्या शुरविरांची अजरामर गाथा समजली पाहिजे म्हणून सुमारे मी अडीच लाखाहून जास्त निधी पुस्तकाच्या रूपाने जमा केला. फाउंडेशनला आर्थिक ताकद मिळाली. काकांच एक स्वप्न होत या जिल्ह्यात सैनिकी प्रशिक्षण केंद्र व्हायला पाहिजे.. त्यासाठी त्याची तळमळ आणि प्रयत्न होते. अनेक पुढाऱ्यांना भेटलो, अधिकाऱ्यांना विनवण्या केल्या पण त्यात काकांच्या आणि आमच्या दुर्दैवाने यश आले नाही. ते शेवटपर्यंत त्यासाठी प्रयत्न करत होते.
काळ आणि वय कुणासाठी थांबत नाही.. काकांना आणि काकूना अनेक व्याधी सुरु झाल्या. कांकूच्या दोन किडण्या निकामी झाल्या. डायलिसिस सुरू झाले… काकांनाही शारीरिक अशक्तपणा जाणवायला लागला. या काळात खऱ्या अर्थाने त्यांना साथ दिली ती कणकवलीचे सामाजिक कार्यकर्ते श्री बाळू मेस्ञी,प्रा.विलास सावंत यांनी.पञकार शेखर सामंत तर आपल्या सगळ्या प्राथमिकता बाजूला ठेवून पहाडा सारखे त्यांच्या पाठीशी उभे राहिले…
कांकूची तब्येत खालावतं गेली. उपचाराना साथ मिळेनाशी झाली आणि दोन वर्षांपूर्वीच या विरमातेने या जगाचा निरोप घेऊन आपल्या शुरसेनानी पुञाच्या भेटीला गेल्या.
काकू गेल्या आणि कदम काका एकटे पडले… सर्वाथाने ते अपंग झाले… अगतिक झाले.. प्रकृतीकडे दुर्लक्ष झाले.. मानसिक दृष्ट्याही खंगले.. अशावेळी पुन्हा देवदूत म्हणून धावून आले ते बबन काका आणि शेखर सामंत… सुमारे दहा महिन्याहून जास्त काळ या सेवाव्रतीनी त्यांची काळजी घेतली.. महिन्याभरापूर्वीच त्यांना सपत्नीक भेटायला गेलो… तेव्हा आनंदाने म्हणाले.. माझा नकुल आला.. माझ्या दोन्ही मुलींची चौकशी केली.. काय म्हणतात स्नेहप्रिया…? मला खूप गहिवरून आलं… त्यानंतर पुन्हा वीस दिवसांनी त्यांची भेट झाले.. खूपच थकले होते.. कृष झाले होते.. तेव्हाच मी खूणगाठ बांधली.. की काका आता आपले जास्त दिवसांचे सोबती नाहीत..
चार दिवसापूर्वीच शेखरचा आणि बबन कांकाचा फोन आला… कदम काका सिरीयस आहेत. व्हेंटिलेटर आहेत… अखेर या विरपित्याने ११जुलै रोजी या जगाचा निरोप घेतला…
आज कांकाच्या अंतिम संस्काराला सपत्नीक उपस्थित होतो… मागचे सगळे दिवस आठवत होते.. त्यांचा सहवास, प्रेम, जिव्हाळा… सगळं सगळं आठवत होतं. निरोप देण्यासाठी त्यांचा नातू सिद्धांत, त्याची स्नुषा ले. कर्नल स्मिता, त्यांची बहीण आणि पुतण्या उपस्थित होते…अनेक शासकीय अधिकारी व पद्मश्री गंगावणे यांनीही काकांच शेवटचं दर्शन घेतलं.खरचं मला सार्थ अभिमान वाटतो तो माझे पञकार मिञ शेखर सामंत यांचा.. तो तेजस्वी पञकार आहेच पण एक संवेदनशील सामाजिक कार्यकर्ता आहे. गेले चार दिवस कांकाच्या उपचारांसाठी आणि त्यांच्या दु:खद निधनानंतर जे त्याने कष्ट घेतले त्याला तोड नाही… हा समाज अशाच सेवाव्रतींच्या समर्पणामुळेच टिकून आहे.
माझ्या अटल प्रवासातील एक तारा निखळला…
काका भावपूर्ण आदरांजली..
…नकुल पार्सेकर..