दीपक केसरकर यांचे सूचक विधान
सावंतवाडी :
खासदार विनायक राऊत यांच्यामुळे मला मंत्रीपद मिळाले असते, तर आपण त्या खुर्चीवर बसलोच नसतो. आम्हीच उठविलेल्या लाटेवर निवडून येऊन जर उपकारांची जाण नसेल तर आमदारकी आधी खासदारकीची निवडणूक येते, हे त्यांनी ध्यानात ठेवावे, असा सूचक इशारा आ. दीपक केसरकर यांनी खासदार राऊत यांना दिला.
सेनेतील बंडाळी व त्यानंतर राज्यात घडलेल्या सत्तांतरानंतर पहिल्यांदा सावंतवाडी दौर्यावर आलेले शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
आम्ही जो निर्णय घेतला तो जनहितासाठी आहे, पक्षावर जरी आमचं प्रेम असलं तरी बांधिलकी ही मतदारांशी आहे. त्यामुळे जनतेची कामे अर्धवट राहिली तर जनतेला उत्तर काय द्यायचे? याच विचाराने आम्ही हा निर्णय घेतला, असे त्यांनी यावेळी राजकीय निर्णयाबाबत स्पष्टीकरण दिलं.
खासदार विनायक राऊत यांच्यावर व्यक्ती म्हणून आपण टीका करणार नाही. परंतु त्यांना वाटत असेल की, सावंतवाडीमध्ये आपला नातेवाईक आमदार व्हावा तर त्यांनी तसा प्रयत्न जरूर करावा. सत्तेच्या काळात ते मुख्यमंत्र्याच्या रोलमध्येच गेल्यासारखे वावरत होते. त्यामुळे त्यांना दुःख झालं असेल की आपल्याला वर्षावर आता जागा राहिली नाही. जेवढा काळ त्यांनी सत्ता उपभोगली तेवढी उद्धव ठाकरे यांनीही उपभोगली नाही असा टोला लगावतानाच आमच्या मतदारसंघातील कामे आम्ही विनायक राऊत यांच्याकडे मांडत होतो. परंतु त्यांनी ती कधीच मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचवली नाहीत. त्यामुळे त्यांच्या याच वृत्तीला आमदार कंटाळले होते. म्हणूनच आज जे काही घडलं त्याला हे देखील तितकेच जबाबदार आहेत, अशी टीकाही केसरकर यांनी केली.
राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये जास्तीत जास्त किती माणसांना कॅबिनेट मंत्री करावे यावर मर्यादा घातली आहे. यामुळेच काहिसा मंत्रिमंडळ विस्तार लांबलेला आहे. शिंदे सरकार हे जनतेच्या हिताचे सरकार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रात्रंदिवस काम करीत असून हे दोघे लवकरच महाराष्ट्राला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.