डॉ.ऋचा कुलकर्णी यांच्याहस्ते अनावरण ; संवाद परिसार आणि तळेरे पंचक्राेशी पत्रकार संघाचा उपक्रम….
कणकवली
ज्येष्ठ कवी,गझलकार स्व. मधुसूदन नानिवडेकर यांच्या प्रथम स्मृती दिनाचे औचित्य साधून तळेरे येथील डॉ.मिलिंद कुलकर्णी व डॉ.सौ.ऋचा कुलकर्णी यांच्या चैतन्य नर्सिंग होम समोरील प्रांगणात “मधू कट्टा” उभारण्यात आला. याकट्टयाचे अनावरण डॉ.सौ.ऋचा मिलिंद कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.
ज्येष्ठ कवी, पत्रकार, लेखक आणि रसिकांच्या मनामध्ये अधिराज्य मिळवून गझलकार म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर नावलौकिक मिळवला. नानिवडेकर हे चालते बोलते विद्यापीठ होते. त्यांनी गझलेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले होते. राज्यभरातील नवोदित कवी, गझलकारांना ते प्रेरणास्थान व मार्गदर्शक होते. परंतु त्यांच्या अकाली जाण्याने एक मार्गदर्शक हरपल्याची भावना साहित्य क्षेत्रात निर्माण झाली होती.त्यांच्या चिरंतन स्मृती जागविण्यासाठी संवाद परिवार, तळेरे आणि तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाने विशेष पुढाकार घेऊन मधुसूदन नानिवडेकर यांना अभिप्रेत असलेले कार्य व त्यांचा वारसा जपण्यासाठी “मधुस्मृती” च्या माध्यमातून सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
मधुसूदन नानिवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तळेरे येथे संवाद परिवाराच्या माध्यमातून साहित्यिक विषयक चळवळ सुरू करण्यात आली होती. यासाठी नानिवडेकर यांचे मोठे योगदान होते. त्यामुळेच या साहित्यिक कट्ट्याला स्व. मधुसूदन नानिवडेकर यांचे नाव देण्याचा निर्णय संवाद परिवाराने घेतला होता.
या कट्टयाला “मधु कट्टा” असे नाव देण्यात आले. त्यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त या मधु कट्टयाचे अनावरण डॉ. सौ.ऋचा मिलिंद कुलकर्णी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले. त्यानंतर नानिवडेकर यांना अभिवादन करून श्रध्दांजली वाहण्यात आली. याप्रसंगी स्व.सुनिल तळेकर ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश तळेकर, वाचनालयाचे माजी अध्यक्ष अशोक मुद्राळे, तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्तात्रय मारकड, पत्रकार व अक्षरयात्री- निकेत पावसकर ,सचिव- संजय खानविलकर, श्रावणी काॅम्प्यूटर तळेरेच्या संचालिका व ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेच्या कणकवली तालुका महिला संघटक सौ.श्रावणी मदभावे, प्रज्ञांगण परिवाराचे संस्थापक सतिश मदभावे, युवा चित्रकार – अक्षय मेस्त्री,सचिन विचारे व अन्य सहकारी उपस्थित होते.