You are currently viewing वासरात लंगडी गाय असणाऱ्या विनायक राऊतांच्या कानात अजून वारं भरलं तर नवल नाही..

वासरात लंगडी गाय असणाऱ्या विनायक राऊतांच्या कानात अजून वारं भरलं तर नवल नाही..

भाजपा ओरोस मंडल तालुकाध्यक्ष दादा साईल यांची विनायक राऊतांवर खरमरीत टीका

 

कुडाळ :

 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका करणाऱ्या शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यावर भाजपचे ओरोस मंडल तालुकाध्यक्ष दादा साईल यांनी सडेतोड टीका केली आहे. विनायक राऊत यांनी संसदेत स्वतःच्या अघोरी हिंदी मधून फक्त वडापावच्या गोष्टी कराव्यात, विकासाची गती आणि कार्यक्षमता यावर बोलू नये, असे दादा साईल यांनी म्हटले आहे.

श्री. साईल यांनी म्हटले आहे की, रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात गेल्या आठ वर्षात खासदार निधी पलीकडे एकही रुपयाचे विकास काम आणि कोणताही नवीन प्रकल्प न आणणाऱ्या खासदारांना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर बोलण्याचा अधिकार नाही. काल उरलेल्या सुरलेल्या शिवसेनेचे खासदार आणि जेष्ठ नेते म्हणवून घेणाऱ्या विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे निष्क्रिय मंत्री असल्याने त्यांना मंत्रिमंडळातुन वगळणार असल्याची गोपनीय माहिती त्यांना मिळाल्याचे विधान केले होते. विनायक राऊत यांनी राणे साहेबाना पद आणि पत सांभाळण्याची सूचना करण्यापेक्षा राऊत आणि त्यांच्या चांडाळ चौकडी कंपनीच्या अघोरी कारनाम्यामुळे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांनी कष्टाने आणि अपार मेहनतीने उभी केलेली शिवसेना आज धुळीस मिळाली आहे ती टिकवण्यासाठी प्रयत्न करावेत. केंद्रीय मंत्रिमंडळातील गोपनीय माहिती मिळवेपर्यंत खासदार विनायक राऊत यांना स्वतःच्या पक्षातील चाळीस आमदार फुटून स्वतंत्र गट स्थापन करेपर्यंत कोणतीच माहिती मिळाली नाही याचे आश्चर्य वाटते. की माहिती मिळवून देखील त्यांनी ती जाणून बुजून उद्धव ठाकरेंनी दिली नाही याची चौकशी करावी लागेल.

शिवसेनेतील बहुतांश वजनदार जेष्ठ आमदार आणि नेते निघून गेल्यामुळे विनायक राऊत यांना आता उरलीसुरली शिवसेना म्हणजे “वासरात लंगडी गाय शहाणी” अशी गत झाली आहे. खासदार विनायक राऊत याना स्वतःच्या मतदारसंघात आपल्या खासदार निधीपलीकडे एकही रुपया आणता येत नाही त्यांनी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे आणि आता केंद्रीय मंत्री म्हणून संपूर्ण भारताचे प्रतिनिधित्व करणारे अभ्यासू आणि विकासाची दूरदृष्टी असणाऱ्या राणे साहेबांवर टीका करण्याचे धाडस करू नये. “गिरे तो भी टांग उपर” अशी सध्या सगळ्याच शिवसैनिकांची गत आहे. त्यात या वासरात लंगडी गाय असणाऱ्या विनायक राऊतांच्या कानात अजून वारं भरलं तर नवल नाही. विनायक राऊत यांना स्वतःच्या गावातील साधी सोसायटी पण जिंकता येत नाही, असेही दादा साईल यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा