You are currently viewing सावंतवाडीच्या संस्थानकालीन श्री.विठ्ठल मंदिरात भक्तांची मांदियाळी

सावंतवाडीच्या संस्थानकालीन श्री.विठ्ठल मंदिरात भक्तांची मांदियाळी

सावंतवाडीचे श्री विठ्ठल मंदिर म्हणजे सावंतवाडीची शान.

सावंतवाडीत फिरताना कुठूनही विठ्ठल मंदिरचा अद्भुत नयनरम्य असा कळस दृष्टीस पडतो आणि नकळतपणे विठ्ठलाच्या चरणाशी आपले हात जोडले जातात. अगदी श्रद्धेने भक्ती भावाने जोडलेले आपले हात आपल्या मनातील भावना विठ्ठलाच्या चरणाशी नेऊन ठेवतात.

सावंतवाडीतील श्री विठ्ठल मंदिर हे कधीकाळी सावंतवाडीच्या मोती तलावाच्या काठावर वसलेले होते. असे म्हणतात की विठ्ठल मंदिराच्या पायऱ्यापर्यंत सावंतवाडी मोती तलावाचे पाणी असायचे.

आज आषाढी एकादशी दिवशी पंढरपुरात वारकरी दाखल झाले आणि आपल्या लाडक्या पांडुरंगाच्या दर्शनाने ते धन्य धन्य झाले. परंतु सावंतवाडीतील हजारो भाविकांना संस्थानकालीन श्री विठ्ठल मंदिर हेच पंढरपुर भासले.

आषाढी एकादशीच्या पहाटेस काकड आरती होऊन श्री विठ्ठलाचा दुग्धाभिषेक झाल्यावर विठ्ठलाच्या दर्शनासाठी भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

एकादशीचा उपवास असल्याने सावंतवाडीतील अनेक भाविकांनी विठ्ठलाच्या चरणावर वाहण्यासाठी कुणी हातात तुळशी तर कोणी तुळशीच्या माळा घेऊन विठ्ठलाच्या दर्शनासाठी श्री विठ्ठल मंदिरात दाखल झाले.

अगदी पंढरपूरचा विठ्ठल देखील असा देव आहे ज्याच्या चरणापाशी भक्तांना माथा टेकता येतो तशाच प्रकारे सावंतवाडीतील विठ्ठल मंदिरात अनेक भक्तांनी विठ्ठलाच्या चरणाशी तुळशी वाहून श्री विठ्ठलाचे मनोभावे, भक्ती भावाने दर्शन घेतले.

संस्थानकालीन सावंतवाडीच्या श्री.विठ्ठल मंदिरात आठ दिवस हरिनाम सप्ताह सुरू असतो या सप्ताहाचा शेवट आषाढी एकादशीच्या एक दिवस अगोदरच झाला. या दिवशी महाप्रसादात अळूची भाजी हे विशेष आकर्षण असते.

श्री विठ्ठलाच्या हरिनाम सप्ताहाच्या वेळी सावंतवाडीतील श्री निलेश मिस्त्री संचालित श्री सद्गुरु संगीत विद्यालय प्रस्तुत भक्ती गीतांचा सुरेल असा कार्यक्रम रंगला होता.

या कार्यक्रमात सावंतवाडीतील सद्गुरु संगीत विद्यालयाचे अनेक गुणी गायक गायिका यांनी श्री विठ्ठलाच्या चरणाशी आपल्या गीत रचना सादर केल्या. या कार्यक्रमात हार्मोनियम वर स्वतः श्री निलेश मे, तबला श्री. किशोर सावंत कुमार नीरज भोसले, श्री.मेस्त्री यांनी साथ केली होती.

हरिनाम सप्ताहच्या वेळी श्री सद्गुरू संगीत विद्यालयाने सादर केलेल्या भक्ती गीतांच्या सदाबहार कार्यक्रमासाठी सावंतवाडीतील अनेक विठ्ठल भक्त आणि संगीत प्रेमींनी उपस्थिती दर्शवून मंदिराचा परिसर भक्तांच्या मांदियाळीने भरून गेला होता.

आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने सावंतवाडीतील विठ्ठल भक्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी श्री विठ्ठल मंदिरात मोठ्या संख्येने दाखल झाले असून विठ्ठल मंदिरापासून बाजारपेठेपर्यंत झाली मोठी विठ्ठल भक्तांची लांबच लांब रांग लागली आहे.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने सावंतवाडीतील विठ्ठल भक्त विठ्ठल चरणी लीन होताना दिसून येत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा