कुडाळ (पणदूर) :
बळीराजासाठी एक दिवस या उक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद पणदूर प्राथमिक शाळा नंबर २ येथील शाळेत मुलांना शेतात लावणीचे प्रात्यक्षिक कसे करायचे हे दाखवले.
शेती विषयक अवजारांची माहिती सांगितली तसेच गावातील धनेश नर्सरीला भेट दिली. नर्सरी मालकांनी शाळेतील मुलांना नर्सरीतील विविध झाडांची माहिती दिली.
कलमे कशी बांधतात तसेच झाडांची निगा कशी राखतात, खत केव्हा देतात याविषयी मार्गदर्शन केले. वाटेने जाताना निसर्गातील झरे, वारूळ, ओढे विविध झाडे, पक्षी, औषधी वनस्पती, रानभाज्यांची ओळख शिक्षकांनी मुलांना करून दिली.
तसेच शाळेत रानभाज्यांचे प्रदर्शन लावले होते. यात शेवगा, पेवगा, अळू, कुड्याच्या शेंगा, भारंगी, कुरडू तेरा, टाकूळा इत्यादी रानभाज्यांची मुलांना माहिती देण्यात आली.
या उपक्रमात धनेश नर्सरीचे मालक श्री रत्नदीप सावंत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. संजना नाईक, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुमन कदम, सहकारी शिक्षिका सौ.विशाखा सावंत इत्यादी उपस्थित होत्या.