*जागतिक साहित्य कला मंचचे सदस्य श्री सुभाष आनंदा मंडले यांनी लिहिलेली अभंग रचना..*
माझे साहित्यिक मित्र, जागतिक साहित्य कला मंचचे संपर्क प्रमुख श्री. विलास कुलकर्णी सर (मीरा रोड) यांनी यावर्षी आशाढी वारी निमित्त अभंग लिहण्यासाठीची विनंती केली, पण मी या आधी कधी ‘अभंग’ हा रचना प्रकार हाताळला नव्हता आणि पुर्वी अभंग हे संत सज्जनांनी लिहलेले आहेत. त्यामुळे आत्ता आपण तशी अभंग रचना करणे म्हणजे ओंजळीतील पाण्याने समुद्रातील अथांग, अफाट पाण्याशी बरोबरी केल्यासारखे होईल असे मला वाटते, पण श्री विलास कुलकर्णी सर यांनी अभंग रचनेचे नियम थोडक्यात समजावून सांगितले व आपल्या मनातील भाव, पांडुरंगा बद्दलची आर्तता अभंगाच्या रूपातून बाहेर येऊ द्या, असे सांगत अभंग लिहण्याची विनंती वजा सुचनाच केली.
यावर्षी पंढरपूरला पायी जाणाऱ्या आशाढी वारीतील वारकऱ्यांचा आनंद, उत्साह जवळून पाहता आला व आळंदीत जाऊन पालखी सोहळा मनात साठवून ठेवता आला.
आळंदीत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतले. देहू आळंदीतून पांडूरंगाच्या भेटीला निघालेल्या पालखी समोर नतमस्तक होता आले, पण कामातील जबाबदारीमुळे पुढे पायी वारीत सहभागी होता आले नाही, म्हणून पंढरीच्या पांडूरंगाला इथूनच नमस्कार केला आणि परतीच्या प्रवासाला लागलो.
या व अशाच आशाढी वारीतील माझ्या मनातील भावना अभंगातून व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे…
*अभंग- आशाढी वारी*
जगत माऊली। विठू तू पालक।।
नाद मधूरक। मायबापा।।१।।
आशाढी वारीला। येऊ ना शकलो।।
मी ना मी उरलो। पांडुरंगा।।२।।
तुझ्या दर्शनाला। हरवले चित्त।।
नको ते वित्त। विश्वनाथा।।३।।
येऊनी आळंदी। दर्शूनी माऊली।।
घेतली साऊली। दीनानाथा।।४।।
निघाली निघाली। पालखी निघाली।।
मन झाले खाली। विठूराया।।५।।
घेताना निरोप। झाला जयघोष।।
होई ना संतोष। कृपावंता।।६।।
तुझ्या दुराव्याने। उरला ना गंध।।
उरले ना बंध। भगवंता।।७।।
*श्री. सुभाष आनंदा मंडले*
*(9923124251)*