नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केली मागणी
कणकवली
कणकवली शहरातील फ्लाय ओव्हर ब्रिजवर काल रात्री झालेल्या अपघातात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मृत्यूला महामार्ग चौपदरीकरण ठेकेदार कंपनी व महामार्ग अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केली आहे.
गेली दोन वर्ष महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत अनेक समस्या प्रलंबित आहेत. कणकवलीत फ्लाय ओव्हर ब्रिजवर महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या एका लेनवरच सिमेंट बॅरिकेट लावण्यात आली आहेत. मात्र सुरक्षितेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यामुळे त्या ठिकाणी आतापर्यंत अनेकदा अपघात झाले आहेत. मात्र असे अपघात होऊन देखील ठेकेदार कंपनीला जाग आलेली नाही. याबाबत वारंवार मागणी करून देखिल ब्रिजचे धोकादायक काम हटवले गेले नाही. व महामार्गावरच लावलेली बॅरिकेट देखील काढली गेली नाही. त्यामुळे हे अपघात होऊन मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. अशा वेळी या मृत्यूस कारणीभूत म्हणून महामार्ग ठेकेदार कंपनी व महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी यांच्यावर देखील गुन्हा दाखल करावा अशी मागणी श्री नलावडे यांनी केली आहे. याबाबत गांभीर्याने दखल न घेतल्यास येत्या काळात महामार्ग प्राधिकरण च्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली जाईल असा इशारा देखील समीर नलावडे यांनी दिला आहे.