प्लास्टिक पिशव्या बंदी प्रकरणी व्यापाऱ्यांची मागणी; मुख्याधिकारी जिरगे यांची घेतली भेट
मालवण
मालवण शहरात नगरपालिकेने प्लास्टिक बंदी नियम मोडणाऱ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे सत्र सुरू केल्यानंतर मालवणातील व्यापारी बांधवांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांची भेट घेत शासन नियमानुसार निश्चित करण्यात आलेल्या प्लास्टिक वापराच्या पिशव्या मार्केट प्रथम उपलब्ध होईपर्यंत प्रशासनाने सहकार्य करावे, अशी मागणी केली.
दरम्यान, मुख्याधिकारी जिरगे यांनी शासनाने प्लास्टिक बंदीबाबत नवीन नियमाप्रमाणे कमी मायक्रॉनच्या प्लास्टिक वापरावर घातलेल्या बंदीचे प्रामाणिकपणे पालन करण्यासाठी प्रत्येकाने शपथ घेतली पाहिजे, प्रशासन आपल्या पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी कार्यरत आहे. असे असतानाही प्रत्येक व्यक्तीनेच आपण शासनाला सहकार्य करण्याची भुमीका घेतल्यास पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाचे योगदान लागेल असे सांगितले.
यावेळी मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरूरकर, जिल्हा व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष नितीन तायशेटये नानाशेठ पारकर, विनायक सापळे, गणेश प्रभूलकर, उमेश शिरोडकर, हरेश देऊलकर, योगेश बिळवसकर, हेमंत शिरगावकर, सरदार ताजर, छोटू लुडबे, गावकर, सचिन शारबिद्रे तसेच शहरातील इतर व्यापारी बांधव उपस्थित होते.
मालवण शहरात कुठेही प्लास्टिक बनविण्याचा कारखाना नाही आहे. मालवणात बाहेरूनच येणाऱ्या मालावर काम केले जात आहे. यामुळे आम्हाला शासन नियमानुसार आवश्यक असणारे प्लास्टिक उपलब्ध करून दिल्यास आम्ही तातडीने
त्याबाबत कार्यवाही करू यासाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. काही वेळा ग्राहकाकडून प्लास्टिक पिशवी न दिल्यास खरेदी केलेला माल न घेता माघारी जाण्याचे प्रकार होत आहेत? यातही व्यापारी वर्गाचे नुकसान होत आहे. चिकन आणि मटण दुकानदार यांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसणार असल्याचेही यावेळी व्यापारी वर्गाने सांगितले.