वैभव नाईक यांच्या पाठपुराव्याला यश ; श्री. ठाकरे, श्री. शिंदे यांचे मानले आभार…
मालवण
विजेचा धक्का लागून अपघाती मृत्यू झालेले महावितरण कंपनीचे कंत्राटी वायरमन आनंद कृष्णा मिराशी यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून १ लाख रुपयाचे आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले आहे. आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निधी मंजूर केला असून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निधी वर्ग करण्यात आला आहे. त्याबद्दल उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांचे आमदार नाईक यांनी आभार मानले आहेत.
महावितरण कंपनीचे आचरा उपविभाग येथे कार्यरत असलेले कंत्राटी वायरमन व आचरा वरचीवाडी येथील रहिवासी आनंद कृष्णा मिराशी (वय- २२) हे विद्युत पोलवर वीज दुरुस्तीचे काम करत असताना विजेचा धक्का लागून त्यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यांच्या अपघाती मृत्यूने मिराशी कुटुंबावर मोठे संकट ओढवले. श्री. मिराशी यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची व हलाखीची असून त्यांच्यावरच संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून होता. त्यामुळे मिराशी कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून अर्थसहाय्य मिळावे अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. या मागणीची दखल घेऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद मिराशी यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून मानवतावादी दृष्टिकोनातून एक विशेष बाब म्हणून १ लाख रुपये आर्थिक सहाय्य मंजूर केले आहे. हे आर्थिक सहाय्य जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा झाले आहे. त्याबाबतचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. लवकरच या रकमेचा धनादेश आनंद मिराशी यांच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात येणार आहे. अशी माहिती आमदार नाईक यांनी दिली.
मिराशी कुटुंबियांना शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आज निधी मंजुरीचे पत्र दिले. यावेळी आचरा विभागप्रमुख समीर लब्दे, संघटक चंदू गोलतकर, ज्येष्ठ नेते विनायक परब, उपविभागप्रमुख जगदीश पांगे, राजू नार्वेकर, नारायण कुबल, श्याम घाडी, चंदन पांगे, नरेश तारकर, निलेश गावडे, सलमान मुजावर आदी उपस्थित होते.