प्लास्टिकचा वापर आणि विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई
मालवण
देशात एकल वापराच्या प्लास्टिक (सिंगल यूज प्लास्टिक) वस्तूंवर 1 जुलै 2022 पासून बंदी घालण्याचा निर्णय केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून घेण्यात आला आहे. तसेच 75 मायक्रोन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर यापूर्वीच दिनांक 30 सप्टेंबर 2021 पासून बंदी घालण्यात आलेली आहे. *विशेष म्हणजे जर कोणी ‘सिंगल-युज प्लास्टिक’चा वापर करताना आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक आणि त्यांनतर गुन्हा दाखल करण्याची सुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे.* मात्र असे असताना शहरातील अनेक ठिकाणी ‘सिंगल-युज प्लास्टिक’चा खुलेआम वापर केला जात असल्याचे आढळून आल्याने *मालवण नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री संतोष जिरगे यांच्या आदेशान्वये* या विरोधात आता थेट कारवाई करायला सुरवात केली आहे.
मुख्याधिकारी यांच्या आदेशान्वये शहर समन्वयक निखिल नाईक, आरोग्य विभाग लिपिक मंदार केळुसकर, प्रसाद भुते, आनंद वळंजू, सुमित हसोळकर यांनी आज शहरात ठिकठिकाणी प्लास्टिक वापरा विरोधात कारवाई करून दंड वसूल करून, प्लास्टिक जप्त केले.
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून 1 जुलै 2022 पासून ‘सिंगल-युज प्लास्टिक’ (Single Use Plastic) वापरावर बंदी घालण्यात आलेली आहे, प्लास्टिकच्या वापराचे दुष्परिणाम मानवी आरोग्यावर व पर्यावरणावर दिसून आलेले आहेत. शहरातील सुंदर समुद्र किनारे प्लास्टिक कचऱ्यामुळे अस्वच्छ झाल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच *प्लास्टिक कचरा गटार व नाल्यांमध्ये अडकून गटारे व नाले तुंबण्याचे प्रकार होत आहेत;* प्लास्टिकचे एवढे सगळे दुष्परिणाम पाहता *प्लास्टिकचा वापर टाळणे नागरिकांच्या आरोग्याच्या व शहराच्या स्वच्छतेच्या दृष्टीने आवश्यक असल्याचे मत मालवण नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री संतोष जिरगे यांनी व्यक्त करून शहर हितासाठी प्लास्टिक बंदीचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन त्यांनी सर्व नागरिक व व्यापाऱ्यांना केले.*