*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी हेमंत कुलकर्णी यांची अप्रतिम काव्यरचना*
*आमचा चहा*
*वृत्त-पादाकुलक(८+८=१६ मात्रा)*
आधण चहाचे शेगडी वरी
प्रमाण चषके मोजुनी भरी
काळी पूड नि साखर गोरी
मिश्रण रंगे तांबटापरी
आले ठेचुन किंवा किसून
थोडे वरून घातल्यावरी
वेलचीपूड वर भुरभुरता
उकळे खळखळ येत वरवरी
उसळे उकळे हो वर खाली
पसरे सुगंध दरवळ घरभर
दुग्धाने मग शांत होय तो
खाली बसता पुनश्च वरवर
आता पुरता संपर्काग्नी
विझे शेगडी निश्चलतेने
गाळुन ओती कपाकपातुन
बशीत सांडे हिंदकळ्याने
तृप्तच होती आबालवृद्ध
पै पाहूणे अन शेजारी
फक्कड चहास आस्वादण्यास
अवश्य यावे आमच्या घरी
— हेमंत कुलकर्णी,
मुलुंड, मुंबई.