You are currently viewing डॉ दिलीप मालखेडे……..

डॉ दिलीप मालखेडे……..

विध्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावणारे कुलगुरू……

काल परवाची गोष्ट. दिवस रविवार. मी कुलगुरू डाँ. दिलीप मालखेडे यांना भेटावयास त्यांच्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परिसरात असलेल्या निवासस्थानी गेलो. सर अमरावतीला आल्यापासून अशी रितसर भेट झाली नव्हती. सर मागे अमरावतीला प्राध्यापक असताना माझ्याकडे जिजाऊ नगरातील घरी येऊन गेले होते .सौ वहिनीसाहेब देखील आमच्या महापौरांच्या बंगल्यासमोरील जिजाऊ नगरातील घरी येऊन गेल्या होत्या. परवा एका कार्यक्रमात त्यांची भेट झाली आणि त्यांनी आठवण ठेवून भेटायला या असे निमंत्रण दिले. मी रविवारी कुलगुरू साहेबांच्या बंगल्यावर पोहोचलो. तेथील कार्यालय कर्मचाऱ्यांनी आम्हाला बंगल्यातील कार्यालयात बसविले .मी माझे व्हिजिटिंग कार्ड त्या कर्मचाऱ्याजवळ दिले आणि कुलगुरू साहेबांची वाट पाहत बसलो. खरं म्हणजे दिवस रविवार होता. सुट्टीचा दिवस .आरामाचा दिवस .पण साहेबांचा स्वभाव मला माहीत होता. त्यामुळेच मी रविवारी त्यांच्या निवासस्थानी जाण्याचे धाडस केले. साहेब आराम करीत होते .कर्मचाऱ्यांनी त्यांना काठोळे सर आलेले आहेत. कार्यालयात वाट पाहत आहेत. असा निरोप दिला.साहेबांना निरोप मिळताच साहेब घरच्या साध्या पोशाखामध्ये कार्यालयात आले .माझ्याबरोबर प्रा. प्रवीण खांडवे सर होते .मी त्यांना आमच्या पुढील कार्यक्रमाचे निमंत्रण दिले .आणि रविवारी तुमच्या निवासस्थानी आल्याबद्दल दिलगिरीही व्यक्त केली. आम्ही जवळपास एक तास कुलगुरू साहेबांशी चर्चा केली आणि ही चर्चा करीत असताना आमच्या लक्षात आलं की या विद्यापीठातील शिकणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी,प्राध्यापकांसाठी, प्राचार्यांसाठी खूप काही करण्याची त्यांची इच्छा आहे. काही नावीन्यपूर्ण उपक्रम त्यांनी यावेळी आम्हाला सांगितले .विद्यार्थ्यांनी भारताच्या नव्हे जगातही आपला अभ्यासक्रम काही प्रमाणात पूर्ण करून उर्वरित विद्यापीठ परिसरात संबंधित महाविद्यालयात राहून त्याने पूर्ण केला तर अशा विद्यार्थी युवकालाही विद्यापीठातर्फे पदवी देण्याची त्यांची संकल्पना खूपच चांगली वाटली. अनेक वेळा मुले पदव्या घेतात परंतु त्याचे प्रॅक्टिकल नॉलेज त्यांच्याजवळ नसते .त्यांचा तेवढा सराव झालेला नसतो ,मग अशा वेळेस आपली मुले पुण्या मुंबईच्या मुलांच्या तुलनेत कमी पडतात .अमरावतीचे शासकीय महाविद्यालय आणि पुण्याचे शासकीय कॉलेज ऑफ इंजीनियरिंग यामध्ये जमीन असमानचा फरक आहे. पुण्याचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पाहिले म्हणजे अभियांत्रिकी शाखेची भव्यता लक्षात येते. दूरदृष्टी लक्षात येते .तिथली यंत्रसामग्री पाहिली म्हणजे डोळे दिपून जातात. ते सर्व अमरावतीला येईल तेव्हा येईल. पण माझा मुलगा जर त्याच्या अभ्यासक्रमाशी संबंधित काही भाग कुठल्या औद्योगिक क्षेत्रात कुठल्या दुसऱ्या विद्यापीठात किंवा सार्वजनिक क्षेत्रात काही प्रमाणात तो पूर्ण करत असेल आणि उर्वरित अभ्यासक्रम तो अमरावती विद्यापीठाच्या कक्षेत पूर्ण करत असेल तर त्याला पदवी देण्यासाठी विद्यापीठाची दारे त्यांनी उघडी करून दिलेली आहेत. मला वाटते ही एक मोठी उपलब्धी आहे .अनेक विद्यार्थ्यांच्या जवळ, लोकांजवळ कौशल्य असते .परंतु पदवी नसते .याचे चांगले उदाहरण द्यायचे म्हणजे जाधव उद्योग समूहाचे जनक श्री गुलाबराव जाधव यांचे उदाहरण देता येईल .ते जाधव उद्योग समूहाचे पितामह .त्यांनी मॅट्रिकचीही परीक्षा कधी दिली नाही .पण आज एवढा मोठा उद्योग समूह उभारला. अशा व्यक्तीला जर विद्यापीठाने सन्मानित केले तर त्या व्यक्तीबरोबरच विद्यापीठाचा देखील गौरव होऊ शकतो आणि हीच संकल्पना त्यांनी डोळ्यासमोर ठेवून या योजनेची आखणी केली.
कुलगुरू रविवारी देखील काम करतात. हे आमच्या प्राध्यापक मंडळींनी प्राचार्य मंडळींनी आणि विद्यार्थी मंडळींनी लक्षात ठेवले पाहिजे. मला त्यांचे कर्मचारी सांगत होते सर उशिरापर्यंत विद्यापीठाच्या कार्यालयात बसतात .अनेक कामे पेंडिंग असतात. त्याचा निपटारा करतात. आम्ही बोलत असताना लाईन गेली .त्यांनी लगेच आपल्या मोबाईल मधील टॉर्च सुरु केला आणि आम्हाला त्यांच्या दारापर्यंत सोडले. खऱ्या अर्थाने श्री संत गाडगेबाबा यांच्या विचारांना वाहिलेलं एक व्यक्तिमत्व आमच्या विद्यापीठाला कुलगुरू म्हणून लाभले हे खरोखरच आमच्या विभागासाठी भूषणाची बाब असली पाहिजे. फक्त एकच विनंती करावीशी वाटते. आमच्या विद्यापीठ क्षेत्रात सेवा देणाऱ्या प्राचार्यांनी प्राध्यापकांनी आणि विद्यार्थ्यांनी कुलगुरूंचा तंतोतंत आदर्श डोळ्यासमोर ठेवून जर काम केले तर अमरावती विद्यापीठाचे विद्यार्थी या जगात नाव कमाविल्याशिवाय राहणार नाहीत आणि मला खात्री आहे ही वातावरण निर्मिती कुलगुरू मा. डॉ. मालखेडे साहेबांनी करायला सुरुवात केली आहे. त्याला सर्व विभागातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे आणि तो दिवस दूर नाही ज्या दिवशी अमरावती विद्यापीठाचा विद्यार्थी कुठल्याही क्षेत्रात गेला तरी तो हमखास निवडला जाईल .आम्ही सरांच्या या उपक्रमात आमचा सहभाग दर्शविला आहे. आपण देखील त्यांच्या सकारात्मक उपक्रमात सहभागी होऊन आपला खारीचा वाटा उचलावा अशी अपेक्षा होती,आहे व राहिलही.

*प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे संचालक डॉ. पंजाबराव* *देशमुख अकादमी .अमरावती* कॅम्प.9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा