मुंबई :
छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती संचालित प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल, विलेपार्लेच्या खेळाडूंनी राजकोट येथे पार पडलेल्या ३८ सब जूनियर आणि ४८ ज्युनियर डायव्हिंग नॅशनल चॅम्पियनशिप २०२२ या स्पर्धेमधे घवघवीत यश संपादन केले. मुलींच्या १८ वर्षा खालील आणि १३ वर्षाखालील गटात महाराष्ट्राच्या संघाने सांघिक विजेतेपद पटकाविले तर मुलांच्या तिन्ही गटात सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड च्या संघाने सांघिक विजेतेपदाची ट्रॉफी पटकावली. या स्पर्धेत महाराष्ट्राला एकूण ५ सुवर्ण पदके, ७ रौप्य पदक आणि ८ कांस्य पदके मिळाली आहे.
या खेळातील काही स्पर्धकांनी विशेष कामगिरीने तिथल्या प्रत्येकाचीच मन जिंकून गोल्डन गर्ल आणि गोल्डन बॉय असे किताब मिळवले. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्राच्या संघात प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात सराव करणाऱ्या ४ खेळाडूंची निवड झाली होती. संकुलाची क्षमा बंगेरा हीने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत मुलींच्या १८ वर्षा खालील गटात १ मीटर स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग आणि ३ मीटर स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग दोन्ही क्रीडा प्रकरात सुवर्ण पदक पटकावले. वयाच्या १२ वर्षा पासून क्षमा हीने संकुलात डायव्हिंग या खेळाचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली आणि ५ वर्षांच्या सततच्या प्रयत्नांनी तीने इथ पर्यंत मजल मारली. केया प्रभु हीने मुलींच्य १५ वर्षा खालील गटात १मीटर स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग या प्रकारात रौप्य तर हायबोर्ड डायव्हिंग या प्रकारात कांस्य पदक पटकावले. मुलांच्या १८ वर्षाखालील गटात कबीर राव याने १ मीटर स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग आणि ३ मीटर स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग या दोन्ही क्रीडा प्रकारात सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड च्य मुलांशी सामना करत कांस्य पदक पटकावले तर स्वराज लाड याने प्रथमच राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन मुलांच्या १३ वर्षा खालील गटात १ मीटर स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग या प्रकारात कांस्य पदक पटकावले.
संकुलाचे अध्यक्ष श्री. अरविंद रमेश प्रभू आणि सचिव डॉ. मोहन अनंत राणे सर यांचे नियमित सहकार्य आणि प्रशिक्षक सायली महाडीक आणि तुषार गितये यांचे मार्गदर्शन यांच्या जोरावर खेळाडूंनी इथपर्यंत मजल मारली.