मालवण (मसुरे) :
मूळ सावंतवाडी सांगेली आणि आता मुंबई मिरा भाईंदर ठाणे जिल्हा येथे राहणाऱ्या सौ जयलक्ष्मी जयराम सावंत आणि कासार्डे हायस्कूलची माजी विद्यार्थिनी तसेच ओझरम माळवाडी येथील पूर्वाश्रमीची सुषमा भास्कर सावंत यांची ठाणे जिल्हा शिवसेना महिला उपजिल्हा संघटक या पदी नुकतीच निवड झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून ही निवड जाहीर करण्यात आली आहे याबाबतचे लेखी पत्र सौभाग्यवती जयलक्ष्मी सावंत यांना देण्यात आले आहे. शिवसेनेच्या आक्रमक महिला म्हणून त्यांची ठाणे जिल्ह्यामध्ये ओळख आहे. त्यांच्या या निवडीबद्दल मीरारोड, भाईंदर, सावंतवाडी,कणकवली, आणि कासार्डे, ओझरम, तरंदळे गावामध्ये विशेष अभिनंदन होत आहे.
जयलक्ष्मी सावंत याना लहानपणापासूनच सामाजिक क्षेत्राची मोठी आवड होती. शालेय जीवनात त्या खेळामध्ये कबड्डी, बास्केटबॉल या महिला संघाच्या ही कर्णधार होत्या. कासार्डे हायस्कूल या प्रशालेला त्यांनी शालेय जीवनात विविध क्षेत्रांमध्ये नावलौकिक मिळवून दिला होता. विविध सामाजिक क्षेत्रामध्ये महिलांचे प्रश्न मांडण्यात त्या नेहमी अग्रेसर असतात. ठाणे जिल्ह्यातही सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. विविध सामाजिक प्रश्नांच्या मोर्चामध्ये त्यांनी नेहमी भाग घेऊन हे प्रश्न सोडविण्यासाठी मोलाची कामगिरी केली आहे. महिला शिवसेनेचा बुलंद आवाज म्हणूनही त्यांच्याकडे ठाणे जिल्ह्यामध्ये पाहिले जाते. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना त्याने गुरुस्थानी माणून आपल्या समाजसेवेची सुरुवात केली होती. त्यांनी ठाणे जिल्ह्यामध्ये मिरा रोड येथे शाखा संघटक, विभाग संघटक अशी यापूर्वी पदे शिवसेना पक्षाच्या माध्यमातून भूषवली आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन पक्ष नेतृत्वाने त्यांची ठाणे उपजिल्हा संघटक पदी निवड जाहीर केली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा आणि ठाणे जिल्हा येथे विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. यावेळी बोलताना सौ. जयलक्ष्मी सावंत म्हणाल्यात, मिळालेल्या पदाचा उपयोग शिवसेना पक्ष संघटना वाढविण्यासाठी तसेच महिलांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत. भविष्यात ठाणे जिल्ह्यामध्ये शिवसेना नंबर एक राहण्यासाठी आपण निश्चितच प्रयत्न करू. पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संपूर्ण वरिष्ठ पदाधिकारी यांनी दाखवलेला विश्वास आपल्या कामातून सार्थकी लावू असे बोलताना सांगितले. जयलक्ष्मी सावंत यांच्या निवडीबद्दल शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख प्रभाकर जी म्हात्रे, जिल्हा संघटक स्नेहल सावंत, उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण जंगम आणि शिवसेनेच्या सर्व वरिष्ठ नेते पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे