समस्त जगतात संत मंडळींनी खूप अद्भुत,अचंबित करणारी अतुलनीय कामगिरी करुन ठेवलेली आहे. त्यामुळेच जगात जो काही चांगुलपणा शिल्लक आहे ही त्यांच्याच शिकवणीची कृपा आहे. काळ बदलला,विकास होत चालला तरी आधुनिक तंत्रज्ञान अवगत करतांना आपण त्यांच्या वाटचालीवर चाललो तरच ह्या विकासाची चांगली फळ आपल्याला चाखायला मिळतील. एक लक्षात येतयं का ह्या संतमंडळींनी सांगतलेल्या चार चांगल्या गोष्टी आपण अजूनही वाचतोय त्यांची ग्रंथसंपदा आपण जीवापलीकडे काळजी घेऊन जपतोय,म्हणजेच निश्चितच त्यामध्ये काहीतरी अतिशय उद्बोधक नक्कीच आहे.
ह्या संत मंडळी़च्या मांदियाळीत संत ज्ञानेश्वर, त्यांची भावंड, तुकाराम महाराज, नामदेव महाराज आणि अजूनही कित्येक संतांचा समावेश आहे. आज 3 जुलै. संत नामदेव महाराजांची पुण्यतिथी. त्यांना विनम्र अभिवादन.
संत नामदेव महाराज हे महाराष्ट्रातील वारकरी संतकवी होते. त्यांचे आडनाव रेळेकर. ते मराठी भाषांमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवन रचयितांपैकी एक होते. त्यांनी व्रज भाषांमध्येही काव्ये रचली.
आपल्याला ब-याचश्या चांगल्या गोष्टींची माहितीच नसते. आम्ही मागे कुलूमनाली सिमला ट्रीप ला गेलो असतांना अमृतसर, धरमशाला ह्या ठिकाणी ब-याच जागी संत नामदेवांचा फोटो बघायला मिळाला. जरा चौकशी केल्यावर कळलं की त्यांचे पंजाबात बरेच भक्त, अनुयायी आहेत. शिखांच्या पवित्र गुरुग्रंथसाहेब ह्यात चरित्रकार, आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे संत नामदेव हे आद्य प्रचारक होते. त्यामुळे पंजाबी मंडळी संत नामदेवांना खूप मानतात, पूजतात.
त्यांचे जन्मगाव नरसी नामदेव हे महाराष्ट्रातील मराठवाड्यामधील हिंगोली ह्या जिल्ह्यात आहे. भक्तशिरोमणी संत नामदेव हे संत ज्ञानेश्वरांच्या कालखंडात होऊन गेले. वारकरी संप्रदायाचे प्रचारक नामदेव महाराज नामवेदाचे व नामविद्येचे आद्य प्रणेते असलेले महाराष्ट्रातील हे एक थोर संत होत.
त्यांच्या किर्तन, प्रवचनात तर अशी गोडी होती की म्हणतात ह्यांच्या ह्या कलेने प्रत्यक्ष विठ्ठल सुद्धा डोलायला लागायचा. संत नामदेव प्रत्यक्ष श्रीविठ्ठलाच्या निकटवर्ती असलेला सखा होता, असे मानले जाते. संत नामदेव हे वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक असून भारतभर त्यांनी त्या बाबतीत भावनिक एकात्मता साधली. भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी स्वकर्तृत्वाने केले.
शिंपी समाजातील ह्या भक्ताने अलौकिक भक्ती म्हणजे काय ह्याचा जणू दाखलाच दिला.
असं म्हणतात संत गोरा कुंभार यांच्याकडे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव, मुक्ताबाई, संत नामदेव, चोखामेळा, विसोबा खेचर आदी संतांचा मेळा जमला होता. याच प्रसंगी संत ज्ञानेश्वरांच्या विनंतीवरून गोरोबाकाकांनी उपस्थितांच्या आध्यात्मिक तयारीविषयी आपले मतप्रदर्शन केले होते. या प्रसंगानंतरच संत नामदेवांना विसोबा खेचर हे आध्यात्मिक गुरू म्हणून लाभले. स्वतःला ‘नामयाची दासी’ असे म्हणणाऱ्या संत जनाबाई या त्यांच्या परिवारातील एक सदस्य होत्या.
ह्यांची वाड्मयीन संपदा तर खरोखरीच अचंबित करणारी आहे. संत नामदेवाची अभंगगाथा (सुमारे २५०० अभंग) प्रसिद्ध आहे. त्यांनी शौरसेनी भाषेत काही अभंग रचना (सुमारे १२५ पदे) केली. त्यातील सुमारे बासष्ट अभंग (नामदेवजीकी मुखबानी) शीख पंथाच्या गुरुग्रंथ साहेबमध्ये गुरुमुखी लिपीत घेतलेले आहेत. संत नामदेवांनी आदि, समाधी व तीर्थावली या ग्रंथातील तीन अध्यायांतून संत ज्ञानेश्वरांचे चरित्र सांगितले आहे.
त्यांच्या कीर्तनांत अनेक उत्तमोत्तम ग्रंथांचा उल्लेख असे. यावरून ते बहुश्रुत व अभ्यासू असल्याचे लक्षात येते. ‘नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग’- अशी त्यांची योग्यता होती. ‘नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी’ हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते.
भागवत धर्माचे एक आद्य प्रचारक म्हणून संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीनंतर सुमारे ५० वर्षे भागवत धर्माचा प्रचार केला. प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची भावनिक एकात्मता जपण्याचे अवघड काम त्यांनी केले. पंजाबमधील शीख बांधवांना ते आपले वाटतात. शीख बांधव ‘नामदेव बाबा’ म्हणून त्यांचे गुणगान गातात. पंजाबातील ‘शबदकीर्तन’ व महाराष्ट्रातील ‘वारकरी कीर्तन’ यांत विलक्षण साम्य आहे. घुमान (पंजाब) येथे शीख बांधवांनी त्यांचे मंदिर उभारले आहे. बहोरदास, लढ्विष्णूस्वामी, केशव कलाधारी हे त्यांचे पंजाबी शिष्य होत. राजस्थानातील शीख बांधवांनीही नामदेवाची मंदिरे उभारलेली आहेत. ‘संत शिरोमणी’ असे यथार्थ संबोधन त्यांच्याबद्दल वापरले जाते.
असा हा विठ्ठल भक्त 3 जुलै 1350 रोजी अनंतात विलीन झाला. विशेष म्हणजे ह्या विठ्ठल भक्ताचा शेवट पंढरपूर येथे विठ्ठलाच्या चरणाशीच झाला. परत एकदा मनोमन संत नामदेवांना वंदन करुन आजच्या पोस्ट ची सांगता करते.
सौ. कल्याणी केळकर बापट
9604947256
बडनेरा, अमरावती
03/07/2022