बाबुराव धुरी थेट ‘मातोश्री’वर
दोडामार्ग :
शिवसेनेच्या ५० आमदारांनी बंडाळी केल्यानंतर आता शिवसेनेचा मूळ पाया असलेले कार्यकर्ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन साहेब आम्ही आपल्यासोबत आहोत हे सांगण्यासाठी राज्यभरातून नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मातोश्रीवर रीघ लागलेली असतानाच बंडखोर आमदारांचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील सेनेचे उपजिल्हाप्रमुख व माजी तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांनी थेट शनिवारी मातोश्रीवर हजेरी लावत साहेब आम्ही आपल्या सोबत असल्याचा विश्वास पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे.
एका ठिकाणी शिंदे सरकार अस्तित्वात आले असताना व सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक केसरकर यांच्याकडे शिंदे गटांने मोठी जबाबदारी सोपविली असतानाही उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी घेतलेली ही भूमिका आमदार दीपक केसरकर यांच्यासाठी धक्कादायक असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे या भेटी दरम्यान स्वतः खासदार विनायक राऊत, दोडामार्गचे सहसंपर्कप्रमुख संदीप धरणे, राजन मोर्ये, संतोष जाधव, भाई गोवेकर यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. आपली निष्ठा आपल्याला ज्या पक्षाने मोठं केलं त्या पक्षाशी आहे. उद्धव साहेब सांगतील आणि देतील तो आदेश आमच्यासाठी अंतिम असेल. शिवसेनेपेक्षा कोणीही आम्हांला मोठा नाही. त्यामुळे आम्ही शिवसेनेशी आणि ठाकरे कुटुंबियांशी एकनिष्ठ असून सावंतवाडी विधानसभा मतदार संघावर आमदार गेल्याचा कोणताही परिणाम होणार नाही. तळकोकण आणि सावंतवाडी विधानसभा मतदार संघ शिवसेनेचा बालेकिल्ला होता आणि यापुढं सुद्धा तो कायम असेल. खासदार व शिवसेना नेते विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना आहे त्याच ताकदीने पुन्हा कार्यरत राहील असा विश्वास या भेटीनंतर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी व्यक्त केलाय.
इतकेच नव्हे तर यापुढचा सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचा आमदार सुद्धा शिवसेनेचाच असेल असेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे.