३९ व्या वर्धापदिनानिमित्त केला शुभारंभ;१०१ उत्पादकांना केले कर्ज वाटप
ओरोस
जिल्ह्यात पांढरी गंगा आणून जिल्ह्यातील दूध उत्पादन एक लाखापर्यंत नेण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कंबर कसली आहे. यासाठी सध्या दूध उत्पादन घेवून चांगल्या प्रकारे व्यवसाय करणाऱ्या दूध उत्पादकांना जिल्हा बँकेने कमी व्याजदरात कर्ज वितरण करण्यास सुरुवात केली आहे. आज झालेल्या बँकेच्या ३९ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात जिल्ह्यातील तब्बल १०१ दूध उत्पादक शेतकऱ्यांना कर्ज मंजुरीचे पत्र व दुधाची किटली देवून याचा शुभारंभ करण्यात आला आहे.
सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयातील भाईसाहेब सावंत सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, संचालक प्रज्ञा ढवण, विठ्ठल देसाई, रवींद्र मडगांवकर, मेघनाथ धुरी, भगीरथ प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ प्रसाद देवधर, कोल्हापूर येथील गोकुळ दूध संघाचे अधिकारी तथा मार्गदर्शक योगेश खराडे, सर्जेराव पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांच्यासह मोठ्या संख्येने दूध उत्पादक उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यात सध्या चांगल्या प्रकारे दूध उत्पादन घेत असलेल्या रश्मी परब, ज्योती पावसकर, अनिरुद्ध करंदीकर, आत्माराम गोडबोले, ज्ञानेश्वर सावंत, मिथील सावंत, समीर पिळणकर या सात शेतकऱ्यांचा जिल्हा बँकेच्यावतीने किटली देवून सत्कार करण्यात आला.