कुडाळ :
ग्रामपंचायत पणदूर आणि महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या विद्यमाने आयोजित भात पीक शेतीशाळेचा आज पणदूर येथे समारोप करण्यात आला. शेतीमध्ये आधुनिकता यावी आणि शेतकऱ्यांचे उत्पादन आणि उत्पन्न वाढावे या हेतूने ग्रामपंचायत पणदूरच्या वतीने संकरित भात बियाणे वाटप, सुधारित विळे आणि औजारे वाटप, कडधान्य बियाणे वाटप, भाजीपाला बियाणे वाटप इत्यादी विविध उपक्रम सातत्याने गेले 3 वर्षे 14 व्या वित्त आयोगाच्या निधीमधून हाती घेण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख पिकांपैकी एक असलेल्या भात पिकाचे क्षेत्र आणि उत्पादन वाढावे यासाठी यावर्षी ग्रामपंचायत पणदूर येथे “भात पीक शेतीशाळेचे” आयोजन जून महिन्यापासून करण्यात आले होते. त्याचा समारोप आज करण्यात आला.
यावेळी शेतकरी आणि “भात पीक शेतीशाळेच्या” प्रशिक्षणार्थी शेतकऱ्यांना सुधारित विळ्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी सरपंच दादा साईल आणि कृषी सहाय्यक एस .ए. नाईक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
आभार नूतन कृषी सहाय्यक श्रुती कवीटकर यांनी मानले.
यावेळी सरपंच दादा साईल, उपसरपंच आबा सावंत, ग्रामपंचायत सदस्य अनघा गोडकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष चंद्रकांत साईल, कृषी सहाय्यक एस. ए. नाईक, श्रुती कवीटकर, ग्रामसेवक सपना मस्के आणि शेतीशाळेचे प्रशिक्षणार्थी आणि शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते.