लेखक कवी प्रा.दिलीप सुतार, कुरुंदवाड यांनी कालिदास दिनाचे औचित्य साधून लिहिलेला अप्रतिम लेख
आज गुरूवार दिनांक 30 जून 2022
*आषाढ महिन्याचा पहिला दिवस…*
*महाकवी कालिदास दिन…!*
आषाढ सुरू झाला की आपल्याला आठवण येते ती दोन गोष्टींची…एक म्हणजे महाकवी कालिदास व दुसरी म्हणजे युगेअठ्ठावीस आपल्या कमरेवरती हात ठेऊन उभ्या असणा-या व आपल्या लाडक्या भक्तांची वारक-यांची आतुरतेने वाट पाहणा-या विठूमाऊलीची…पंढरीच्या आषाढ वारीची…!
इ.स.6व्या शतकात मध्य प्रदेशातील मालवा प्रांतातील उजैन मधील राजा विक्रमादित्याच्या दरबारात कालिदास हा महाकवी होता.
कालिदास म्हणजे अलौकिक प्रतिभा लाभलेला …संस्कृत भाषेवर प्रभुत्व असलेला कवीश्रेष्ठ कविश्वर…!
मेघदूतम्,शांकुतलम,रघुवंशम.
कुमारसंभवम,मालविकाग्निमित्रम,विक्रमोर्वंशीयम अशा एकापेक्षा एक रससिद्ध साहित्य कृतींची अनुपम भेट केवळ भारतीयांनाच नव्हे तर जगाला देणारा आपल्या काव्य प्रतिभेत चिंब चिंब भिजायला लावणारा…त्याच्या शब्दसामर्थ्याने मानवी शरीर मन मेंदू रोमांचित करणारा… व बेभान होऊन वाचायला आणि अत्यानंदाने नाचायलाही लावणारा कवीश्रेष्ठ कालिदास…( गटे नावाच्या जर्मन कवीने शाकुंतलम् वाचल्यानंतर ती साहित्यसंपदा अक्षरश: डोक्यावर घेऊन तो नाचला होता असे संदर्भ आहेत)…….
जग हे खूप सुंदरआहे..मानवी जीवन ही खूप सुंदर आहे… हा कालिदासाच्या साहित्यकृतींचा महत्वाचा निष्कर्ष…! आपल्या अवतीभवती चा निसर्ग ,त्याचं सौंदर्य प्रतिक्षणी शारिरीक,, मानसिक भावनिक पातळीवर आपल्याला अनुभवता आलं पाहिजे… आपल्या अवती भोवतीचा समाज ,इतिहास, भूगोल यांच्याशी समरस होऊन फक्त आपल्याला जगता आलं पाहिजे….प्रेमभावना विश्वव्यापी आहे…परंतू ती व्यक्त करण्याच्या पद्धती रितीरिवाज देश प्रदेशानुसार व कालानुसार बदलतात…प्राचीन काळी ‘वसंतोत्सव ‘ स्वरूपामध्ये ती अभिव्यक्त होत होती .आज अनेक देशात ती ‘व्हॅलेंटाइन डे’ च्या रूपामध्ये व्यक्त होताना दिसते …संस्कृत काव्य परंपरेमध्ये सुद्धा विविधअंगानीं ती व्यक्त झालेली दिसते… या अर्थाने मेघदूतम् एक उत्कटप्रेम काव्यचं म्हणावे लागेल …कवी कालिदास हा एक विलक्षण व प्रतिभासंपन्न संपन्न कवी तर होताच…पण तो एक शब्दांचा कुशल जादूगार ,चित्रकार ही होता… तो समाज व मानस मानस शास्त्रज्ञही होता…!
सर्वसाधारणपणे आषाढ सुरू झाला की आकाश ढगाळलेलं असतं …काळ्या मेघांनी व्यापलेलं असतं…वातावरण कुंद कुंद झालेलं असतं …थोडीशी बोचरी थंडी ही असते …तर हे सर्व वातावरण निसर्गातल्या प्रणयातुर पशु पक्षां पासून अगदी मानवापर्यंत सर्वांच्याच मनावर एक वेगळं प्रेमाचं गारुड निर्माण करणार असतं…
काळ्या मेघांनी टाकले
सारे आकाश व्यापून
शब्द शब्द तुझा सखे
थेंबा थेंबात दाटून
गर्द नभ पांघरूण
चंद्र ढगात लपून
मोती होऊन झरते
त्याच्या डोळ्यातले पाणी
त्याच्या अबोल प्रीतीची
जगावेगळी कहाणी
फुलपाखरांच्या ओठी
चिंब पावसाची गाणी…
अथवा…
जीव उदास उदास
जस भरलं आभाळ
तापल्या धरेने रोज
किती सोसावी हि कळ?
मन विदेही विरागी
फिरतसे रानोमाळ
मीरा होऊन दिवानी
शोधतसे घननीळ
हरिप्रिया मी तुझी रे
मला सांभाळ सांभाळ
कवळुन दाही दिशा
आता कोसळं कोसळं…!!!
अशी चराचराची व्याकुळ अवस्था झालेली असते ..आपल्या अनेक संतांनी सुद्धा ही विरही मनाची अवस्था ,आर्तता आपल्या अभंगांमध्ये व्यक्त केलेली आहे…
भेटी लागी जीवा …
लागलीसे आस
यासारख्या विरहिणी संतांनी लिहलेल्या आहेत.
विरही भावाने व्याकूळ होऊन लिहलेल्या कविता, पद्य यानां यासाठीच विरहिणी म्हंटले जाते.
मेघदूत हे खंडप्रेमकाव्य या अर्थाने एक विरहिणीच आहे.. प्रत्येक कवीमनाला व जगभरातल्या प्रेमीजनाना आजही भूरळ घालणारे आहे…!
एक कर्तव्यभ्रष्ट यक्ष,आपल्या प्रियपत्नी पासून प्रियजनांपासून दूर रामगिरीवर एक वर्षाची सक्तीची, एकांताची शिक्षा भोगतो आहे…हे मेघदूताचे कथाकाव्य सूत्र अथवा बीज…पण कालिदासाच्या लेखणीचा परिस स्पर्श झाल्याने ही एकांतवासाची शिक्षा…अनेक प्रेमीजनांसाठी प्रेमाची दीक्षा बनते…
हा एक वर्षाचा काळ हा जसा त्या यक्षासाठी युगासमान वाटत होता …त्याच्या प्रियतमेसाठी…प्राणप्रिय सखीसाठी त्याचे आक्रंदणारे विरही मन …आपल्या भावना तिच्यापर्यंत पोहोचाव्यात म्हणून एका ढगाचा…मेघाचा दूत म्हणून केलेला वापर…किंवा घेतलेला आधार ही संकल्पनाच किती काव्यमय विलक्षण व तितकीच प्रशंसनीय आहे…
मेघदूत हे कालिदासाचे खंडकाव्य हे अशाच अफलातून प्रेमपत्राचं चिरंतन प्रतीक आणि तितकचं सुंदर अक्षर शब्दशिल्प आहे…
प्रेमभाव हा तसा चराचराला व्यापून उरलेला…प्रेरीत करणारा…जन्मदेणारा नैसर्गिक भाव…याच नैसर्गिक भावाला निसर्गाचाच अविभाज्य घटक असणा-या एका ढगाला किंवा मेघाला दूत बनवून आपल्या विरही मनाची तीव्रता आपल्या प्रियतमेपर्यंत पोहचविणारे मेघदूतम ही साहित्य विश्वातली जाईल तिथे सुगंध पसरविणारी काव्य-कस्तुरी आहे…
*आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्टसानुं
वप्रक्रीडा परिणत गज प्रेक्षणीयं ददर्श*
ही आहे कालिदासाच्या अजरामर मेघदूतम् मधील एक काव्यपंक्ती…त्यामुळेच
‘नेमेची येतो मग पावसाळा’या उक्ती प्रमाणेच ‘आषाढस्य प्रथम दिवसे’…म्हणजेच महाकवी कालिदास दिन हे एक अतूट समीकरण बनले आहे…
या दिनाचे औचित्य साधून अनेक साहित्यिक सांस्क्रुतिक कार्यक्रम होतात…कवीकालिदासाच्या साहित्यातील अनेक सुंदर उपमा अलंकारानी आपली मने बुद्धी वाणी… दीपून …उजळून जाते… आपल्याला सौंदर्यासक्त जीवनाची ओढ लागते..
सध्याचा जागतिक महामारीचा लाँकडाऊनचा काळ हा तसा एकांतवासाच्या सक्तीचाच काळ आहे…आपल्या सर्वांच्या आयुष्यातून या कोरोनारूपी एकांतवासाचे अरिष्ट दूर होवो…स्वछंदी मनाने आनंदी व्रुत्तीने जगण्याचे आत्मभान लाभो…आणि आयुष्याची दोरी बळकट होऊन पूर्वी प्रमाणेच विठू माऊलीच्या पंढरीची वारी करण्याचे भाग्य लाभो…या सदिच्छे सह चला तर मग…आषाढस्य प्रथम दिवसे…कालिदासाच्या मेघदूतासोबत…चिंब भिजुया… पावसातही…आणि…. विठ्ठल नामाच्या गजरातही…आणि आषाढाचे स्वागत करूया…प्रेमाने…आपुलकीने…अगदी स्वछंदीमनाने…!!!
*प्रा. दिलीप सुतार*
*कुरुंदवाड*
*मो.नं.9552916501*