कणकवली
राज्यात शिवसेनेवर आलेले संकट दूर करण्यासाठी शिवसेनेचे उर्वरीत नेते मैदानात उतरले आहेत. यात रत्नागिरी-राजापूरचे आमदार राजन साळवी आणि कणकवलीचे सुपुत्र व एकेकाळचे नारायण राणे यांची कट्टर समर्थक असलेले गौरीशंकर खोत यांची शिवसेनेच्या उपनेते पदी निवड करण्यात आली आहे.
गौरीशंकर खोत यांच्याकडे संघटनकौशल्य असून त्या जोरावर ते शिवसेनेसाठी काम करू शकतात. गौरीशंकर खोत यांना मानणारा एक वर्ग असून, गौरीशंकर खोत यांना शिवसेना उपनेते पद दिल्यामुळे येत्या काळात शिवसेनेला कोकणात अजून उभारी मिळण्याची शिवसेना नेतृत्वाला अपेक्षा आहे.
दरम्यान शिवसेना पुन्हा नव्याने उभी करण्यासाठी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे देखील आता शिवसेनेच्या बैठकांना उपस्थित राहत मार्गदर्शन करत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर एकनाथ शिंदे गटात दाखल झाल्याने जिल्ह्यात तसेच कोकणात शिवसेना पुन्हा जोमाने उभे राहावी व केसरकर यांच्या गळाला अजून कोणी लागू नये याकरिता कोकणात शिवसेनेच्या दोन नेत्यांना पक्षाने उपनेते पद देण्यात आली आहेत.