वेंगुर्ला (परुळे) :
विधवा प्रथा बंद करणारी वेंगुर्ले तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे, परुळेबाजार ग्रामपंचायत. ग्रामपंचायत परुळेबाजार च्या मासिक सभा, महिला ग्रामसभा व ग्रामसभेत विधवा प्रथा बंद करण्याबाबत सर्वानुमते ठराव घेण्यात आला. समाजात पतीच्या निधनानंतर पत्नीच्या कपाळावरील कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढणे तसेच महिलांना विधवा म्हणून कोणत्याही प्रकारच्या धार्मिक, सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊ न देणे या प्रथा बंद करण्यात बाबत ठराव घेण्यात आला.
कायद्याने प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जीवन जगण्याचा समान अधिकार दिला आहे. या प्रथेमुळे नागरिकांच्या अधिकारांवर गदा येत आहे. म्हणूजेच कायद्याचा भंग होत आहे. आपल्या गावामध्ये विधवांना सन्मानाने जगता आले पाहिजे. याकरिता विधवा प्रथा बंद करण्यातबाबत ग्रामपंचायत परुळेबाजार ने एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यानुसार याबाबत गावात जनजागृती करण्यात येणार आहे. असे सरपंच, उपसरपंच, ग्रा.प. सदस्य व ग्रामस्थ यांनी एकमुखाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती सरपंच श्वेता चव्हाण यांनी दिली आहे.