You are currently viewing आमदार दीपक केसरकरांच्या होम पिचवर जिल्हाभरातील शिवसैनिकांचा मोर्चा

आमदार दीपक केसरकरांच्या होम पिचवर जिल्हाभरातील शिवसैनिकांचा मोर्चा

सावंतवाडीतील शिवसेना नगरसेवकांची पाठ

सावंतवाडी या आमदार दीपक केसरकर यांच्या बालेकिल्ल्यात शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी भव्य रॅली काढली. सावंतवाडीत दीपक केसरकर यांच्या बंडाच्या विरोधात काढलेल्या रॅलीला कोणतेही गालबोट लागले नाही. त्याची काळजी सेनेच्या पदाधिकारी यांनी घेतली. मात्र शहरातील गांधी चौकात पदाधिकाऱ्यांनी केसरकर यांच्यावर तोंडसुख घेतले. संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी दीपक केसरकर यांचा समाचार घेत मालवणीत गाऱ्हाणं घालताना, शिवसेनेवर आलेली वाईट वेळ टळो आणि जे सोडून गेलेत त्यांचा सत्यानाश होवो, असे विधान गांधी चौकात पत्रकार परिषदेत केले. सेनेच्या रॅलीकडे सावंतवाडी शहरातील सेनेच्या नगरसेवकांनी पाठ फिरविली होती, त्याचप्रमाणे तालुक्यातील काही शिवसेना पदाधिकारी वगळता विशेष कोणी उपस्थित नव्हते. दोडामार्ग येथील बाबुराव धुरी अपवाद वगळता गांधी चौकात मतदार संघाच्या बाहेरीलच सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केसरकर यांच्यावर तोंडसुख घेतले.

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना, “आमची ही रॅली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकारी यांचीच असल्याचे स्पष्ट करण्यात आले”. आमदार वैभव नाईक यांनी पत्रकारांशी संवाद साधताना, शहराची शांतता आम्ही जपल्याचे आवर्जून सांगितले. वैभववाडीच्या अतुल रावराणे यांनी देखील दीपक केसरकर यांच्यावर टीकास्त्र सोडले. शिवसेनेचे भावी आमदार म्हणून मागच्या वर्षभरापूर्वी ज्यांच्याकडे पाहिले जात होते, परंतु गेले वर्षभर शिवसेनेच्या मतदारसंघातील कार्यक्रमांमध्ये दिसून न येणारे विक्रांत सावंत देखील मोर्चामध्ये घोषणा देताना आवर्जून दिसत होते.

दीपक केसरकर यांच्यासोबत राष्ट्रवादीमधून शिवसेनेत आलेल्या शिवसेना महिला जिल्हाप्रमुख सौ.जान्हवी सावंत यांनी दीपक केसरकर यांच्यावर जहरी टीका केली. लोभापायी केसरकरांना अवदसा आठवल्याचे त्या म्हणाल्या. जान्हवी सावंत यांच्या जहरी विधानानंतर सावंतवाडी मतदारसंघात बाहेरील महिलाही केसरकर यांच्या विरोधात जोरदार घोषणा देत होत्या.


सावंतवाडीच्या शिवाजी चौकातून निघालेली शिवसेनेची रॅली पोलिसांच्या आणि सीआरपीएफ च्या कडेकोट बंदोबस्तात बाजारपेठेत दाखल झाली. दीपक केसरकर यांच्या निवासस्थानासमोर शिवसैनिकांनी हुर्यो करत मोठमोठ्याने घोषणा देत “निम का पत्ता कडवा हैं..***** म्हणत बंडखोरी केल्यावर शिवसैनिक कशाप्रकारे चवताळून उठतो याचा प्रत्यय दाखवला.

प्रतिक्रिया व्यक्त करा