वैभववाडी
जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्चितीबरोबरच आवड आणि निवड महत्त्वाची आहे. प्रत्येकाने आपली आवड आणि निवड लक्षात घेऊन योग्य दिशेने मार्गक्रमण केल्यास यशस्वी होता येते असे मत वैभववाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री.सुरज पाटील यांनी व्यक्त केले.
वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाचा उद्घाटन समारंभ प्राचार्य डॉ.सी.एस.काकडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री.सुरज पाटील उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाविद्यालयातील करियर कट्टा विभागाच्यावतीने पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण उद्घाटन समारंभ दिनांक २५ जून,२०२२ रोजी संपन्न झाला. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून स्थानिक समितीचे अध्यक्ष श्री.सज्जन काका रावराणे व स्थानिक समितीचे सचिव श्री.प्रमोद रावराणे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पोलीस उपनिरीक्षक श्री. सुरज पाटील यांच्या हस्ते पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण फलकाचे अनावरण करण्यात आले. श्री. सुरज पाटील यांनी आपल्या मनोगतातून ७२०० पदांच्या होऊ घातलेल्या पोलीस भरती प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी ध्येय ठरवावे, मार्ग नक्कीच सापडेल. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याने आपली आवड आणि निवड यांची योग्य सांगड घालून आपल्या मनाचं योग्य व्यवस्थापन केले पाहिजे. तसेच योग्य व चांगल्या मित्रांची संगत करून स्वतःचे ध्येय निश्चित करून ते ध्येय प्राप्त करण्यासाठी प्रवास सुरू केला पाहिजे.पोलीस व अग्निपथ भरतीची परीक्षा पद्धत समजून घेतली पाहिजे. त्यासाठी येणाऱ्या तीन-चार महिन्याचे योग्य नियोजन करून वाचनाची योग्य ती पद्धत अवलंबली पाहिजे. पोलीस भरतीसाठी आवश्यक असणाऱ्या लेखी परीक्षेसाठी आवश्यक पुस्तकांची माहिती व शारीरिक परीक्षेसाठी कशाप्रकारे तयारी करावी याचे योग्य मार्गदर्शन केले. यश प्राप्त करायचे असेल तर स्पर्धेत मागे वळून पाहता कामा नये. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांने संधीचं सोनं केलं पाहिजे असे सुरज पाटील यांनी सांगितले.
श्री.प्रमोद रावराणे यांनी आपल्या मनोगतातून कामाच्या, कर्तव्याच्या, चाकोरीच्या बाहेर जाऊन कार्य करणे हे अनिवार्य आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने त्याच्या आवडीप्रमाणे त्या क्षेत्राला प्राधान्य द्यावे. जीवनात वाचन हे सर्व श्रेष्ठ आहे. आर्थिकदृष्ट्या कमजोर व कमकुवत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा सदरच्या प्रशिक्षणासाठी येणाऱ्या खर्चाची जबाबदारी स्वीकारणार असल्याचे श्री.प्रमोद रावराणे यांनी सांगितले.
प्रत्येक विद्यार्थ्यांने आपले ध्येय व उद्देश निश्चित केला पाहिजे व आपली प्रगती करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे असे श्री.सज्जन काका रावराणे यांनी सांगितले.
विद्यार्थ्याने पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घेतला पाहिजे व जास्तीत जास्त महाविद्यालयातील आजी-माजी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला पाहिजे असे आवाहन डॉ.सी.एस.काकडे यांनी अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केले.
सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.ए.आर.दिघे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.व्ही व्ही शिंदे यांनी मानले.