विशेष संपादकीय…
महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीच्या मतदानानंतर सत्तेच्या राजकारणात उलथापालथ होऊन महाविकास आघाडीची सत्ता राजकीय सारीपाटावर लागली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने युतीच्या माध्यमातून निवडणूक लढवत एकत्रित 161 जागा जिंकल्या होत्या, यात भारतीय जनता पक्षाने 105 तर शिवसेनेने 56 जागेवर विजय मिळवले होते. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोणाचा? या विषयावर एकमत न झाल्याने सेना-भाजप युतीची महाराष्ट्रात स्थापन होऊ शकली नाही आणि जवळपास पंचवीस वर्षे अबाधित असलेली सेना-भाजप युती संपुष्टात आली होती. शिवसेनेने पहिली अडीज वर्षे आपला मुख्यमंत्री बसवणार या हट्टापोटी विरोधी गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस बरोबर युती करून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेना पक्षाला मुख्यमंत्रीपद मिळाले परंतु मंत्रिमंडळातील महत्त्वाची खाती शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडे व काँग्रेसकडेच राहिली. त्यामुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तरी सत्तेच्या चाव्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातातच राहिल्या. परिणामी शिवसेनेच्या मंत्री, आमदारांना विकासासाठीचा निधी अल्प प्रमाणात मिळू लागला. शिवसेनेच्या आमदारांच्या विरुद्ध त्यांच्या मतदारसंघात असंतोष, नाराजी प्रत्येकाला दिसून आली.
महाविकास आघाडी सरकार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे महत्त्वाची सर्व मंत्रिपदे राहिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या आमदारांना मोठ्या प्रमाणावर निधी मिळू लागला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र मध्ये जोमाने वाढू लागली, परंतु मुख्यमंत्रीपद हाती असून देखील शिवसेनेची पिछेहाट झाली. शिवसेनेच्या मंत्री आमदारांना निधीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांकडे हात पसरावे लागत होते. त्यामुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही शिवसेनेचे आमदार असलेल्या विभागांचा विकास खुंटला होता. शिवसेनेच्या आमदारांमध्ये राष्ट्रवादी नेतृत्व शिवसेना संपवू पाहते असा समज पसरला. त्याचबरोबर शिवसेनेचे मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे यांच्या भोवतीच्या माणसांमुळे आमदारांना उद्धव ठाकरेंना भेटणे मुश्किल झाले होते. आमदार दीपक केसरकर हे सहा महिने मुख्यमंत्र्यांकडे भेटीसाठी वेळ मागत होते, आमदार संजय शिरसाठ हे देखील भेटीसाठी वर्षा बंगल्याच्या बाहेर तासन्तास उभे राहिल्याचे त्यांनी आपल्या वक्तव्यात, मुख्यमंत्र्याना लिहिलेल्या खरमरीत पत्रातून सांगितले आहे. शिवसेनेच्या आमदारांना महाविकास आघाडी सरकार असूनही विकासात्मक कामांसाठी सरकारकडून मदत मिळत नव्हती की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून भेट मिळत नव्हती. त्यामुळे शिवसेनेचे आमदार शिवसेना विधिमंडळ पक्षाचे गटनेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच आपले गाऱ्हाणे मांडत होते.
जून 2022 मध्ये झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडे बहुमत असून देखील शिवसेनेचा दुसरा उमेदवार संजय पवार हे पराभूत झाले व भाजप कडे मताधिक्य नसतानाही भाजपचा उमेदवार निवडून आला. यावेळी राष्ट्रवादीच्या जवळ असणाऱ्या अपक्षांची मते भाजपला पडल्याचा संशय शिवसेनेच्या आमदारांच्या मनात बळावला. आठवड्याभरातच विधानपरिषद निवडणुकीत देखील भाजपने चमत्कार घडवून आणत आपला पाचवा उमेदवार निवडून आणला. राज्यसभेच्या निवडणुकीत पडलेली ठिणगी विधानपरिषद निवडणुकीत ज्वालामुखी बनली आणि शिवसेनेचे प्रमुख नेते असलेले नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या जवळपास तीस आमदारांना घेऊन सुरत कडे प्रयाण केले.
एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाले आणि बरेचसे शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने शिवसेना पक्षात उभी फूट पडल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. शिवसेनेने मिलिंद नार्वेकर व रवींद्र फाटक या उद्धव ठाकरे यांच्या विश्वासातल्या माणसांना एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी पाठवून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. परंतु बंडखोर गटाने आपल्या तीन मागण्या उद्धव ठाकरे यांच्यासमोर ठेवत सुरतहून गुवाहाटी, आसाम येथे आपले बस्तान हलविले. शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिलेले उर्वरित आमदार हे देखील हळूहळू गुवाहाटी येथे जात एकनाथ शिंदे गटात सामील झाले.
शिवसेनेचे बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे भाजपसोबत सरकार स्थापन करण्याची मागणी करून पेच निर्माण केला. हिंदुत्वाचा मुद्दा समोर करत बाळासाहेब ठाकरेंच्या विचारसरणी नुसार आपण यापुढे चालणार असे सांगून आम्ही शिवसेनेतच आहोत, शिवसेना सोडणार नाही असे देखील स्पष्ट केले. शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटाकडे 55 पैकी 44 पेक्षा जास्त आमदार व मंत्री सामील झाले. त्यामुळे शिवसेनेच्या बंडखोर गटाने आम्हीच खरी शिवसेना असा सूर लावून धरला. शिवसेनेपासून दूर गेलेल्या बंडखोर गटाने केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपाने काही मंत्री व आमदारांच्या मागे इडी, आयकर व सीबीआय या त्रिकुटाला लावल्याने इडीच्या भीतीपोटी व चौकशीच्या फेऱ्यात अडकण्यापेक्षा भाजपशी जुळवून घेण्याचा एक प्रयत्न म्हणून शिवसेनेतून वेगळा गट निर्माण करून मुख्यमंत्र्यांकडे भाजपची जुळवून घेण्याचा व भाजप सोबत सरकार स्थापनेचा प्रस्ताव ठेवला.
महाविकास आघाडी सरकार सत्तेत आपल्यापासून शिवसेनेकडे मुख्यमंत्री पद असताना देखील शिवसेना कधीच ड्राइविंग सीटवर बसलेली वाटलीच नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच सरकारची गाडी वेगाने हकताना दिसत होती. राष्ट्रवादी काँग्रेस कडून झालेली गळचेपी व शिवसेनेचे आमदार मंत्री आदींना विकासासाठी अल्प प्रमाणात मिळणारा निधी यामुळे रखडलेला शिवसेना आमदारांच्या विधानसभा क्षेत्रातील विकास आणि महाविकास आघाडी सरकार मधील घटक पक्ष राष्ट्रवादीकडून शिवसेना संपविण्यासाठी होत असलेला प्रयत्न यामुळे शिवसेनेच्या आमदारांमध्ये असंतोष निर्माण झाला. त्यातूनच शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी करून वेगळा गट स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू केल्या.
एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या घडामोडी पाहता दिवसागणिक बंडखोर शिवसेना आमदार एकनाथ शिंदे गटाकडे जाणाऱ्या आमदारांची संख्या वाढतच असून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी व काँग्रेस सोबत असलेल्या आघाडीबाबत फेरविचार करण्यास भाग पाडले आहे. शिवसेनेकडून आमदारांना परत येण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावनिक साद घातली होती परंतु आमदार आपल्या मतांवर ठाम असून “राष्ट्रवादी व काँग्रेस सोबत सरकार नकोच” या मुद्द्यावर अडून राहिले आहेत. शिवसेनेने आमदारांवर कारवाईसाठी नोटीस दिली असून देखील शिवसेनेचे आमदार उद्धव ठाकरे यांची साथ सोडून बंडखोर शिंदे गटाकडे जात असल्याचे दिसते आहे. शिवसेनेमध्ये आजपर्यंत तीनवेळा पक्ष फुटीच्या घटना घडल्या आहेत, त्यावेळी फुटीर गटाने पक्षाप्रमुखांवर जाहीर टीका केली होती. पूर्वी जाणाऱ्यांनी पक्षातून जाण्याच्याच निर्धाराने पक्ष प्रमुखांवर आग ओकली होती परंतु एकनाथ शिंदे सोबत गुवाहाटी मध्ये असलेल्यांनी उद्धव ठाकरेंवर ना टीका केली ना आगपाखड केली. काहींनी उद्धव ठाकरे भेट देत नसल्याने त्यांच्या भोवती असलेल्या बडग्यांवर भाष्य केलं परंतु आपल्या नेत्यावर, बाळासाहेबांवर असलेलं प्रेम वारंवार दाखवून दिले आहे. परंतु बंडखोर आमदारांच्या भूमिकेमुळे राज्यातील शिवसैनिकांमध्ये असंतोष पसरला असून बंडखोरांच्या घरांवर शिवसैनिकांकडून हल्ले करण्यात येत आहेत. यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
शिवसेनेचे 90% आमदार, मंत्री एक एक करून शिंदे गटात सामील झाल्यामुळे राजकीय भूकंप झाला तरी दुसऱ्या बाजूने विचार केला असता, ही नक्कीच बंडाळी आहे का? की पक्षाकडून कोणीतरी ही बंडाळी घडवून आणतो आहे? असेही प्रश्न जनतेच्या मनात उत्पन्न होत आहेत. कारण सगळीकडे असंतोष, आमदारांच्या कार्यालय, घरांवर हल्ले होत असतानाही सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत हे 27 जून रोजी गुवाहाटी येथे जात शिंदे गटाशी गळाभेट करताना दिसून आले. संध्याकाळी ठाकरे यांच्यासोबत मीटिंग करणारे आमदार रात्री गुवाहाटी येथे एकनाथ शिंदे गटासोबत भोजन करत होते. एकंदरीत सर्व परिस्थिती पाहता “दाल में कुछ तो काला हैं” असेच दिसत आहे. तरीही शिवसेनेत झालेली बंडाळी आणि उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना घातलेली भावनिक साद यामुळे राज्यात ठिकठिकाणी शिवसैनिक रस्त्यावर उतरल्याचे चित्र दिसत असून मरगळलेल्या शिवसैनिकांमध्ये पुन्हा एकदा पक्षासाठी असलेली तळमळ आणि बाळासाहेबांवर असलेली निष्ठा ठासून भरलेली दिसत आहे आणि हे चित्र मात्र शिवसेनेच्या पुढील प्रवासासाठी निश्चितच आशादायी आहे.