जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार यांचा अप्रतिम लेख
तो चांगला खूप शिकलेला तरूण होता. स्मार्ट पण
डावखोरा.. हे डावखोरे लोक डोक्याने अतिशय तेज असतात.
त्यांची ही बुद्धी सकारात्मक कामांकडे वळली तर ठीक नाहीतर
यांच्या इतका त्रासदायक माणूस सापडणे मग कठीण !
ते ज्यांच्या वाट्याला येतील नशिबात येतील त्यांचे मग एक तर
कल्याण होते नाही तर ते पुर्ण घराचे वाटोळे करतात.
अशाच एका शामरावची कथा मी तुम्हाला सांगणार आहे.
शामराव एका प्रतिष्ठित व मोठ्या कुटूंबात जन्माला आलेला.
पूर्वी कुटूंब मोठेच असायचे नि तरी ही सुरळीत चालायचे.
शामरावचे वडील ही गांवातील बडे प्रस्थ होते.नाव लौकिक होता.प्रतिष्ठा मान सन्मान होता.त्यांच्या परीने जग रहाटी प्रमाणे मुलामुलींची लग्ने त्यांनी केली.तसे सगळेच सुस्थळी
पडले म्हणा ना ? पाटलांचं घोडं गंगेत न्हालं! पाटील जबाबदारीतून मुक्त झाले.तिन्ही मुले छान मार्गी लागली होती.
सगळ्यात लहान शामराव सरकारी नोकरीत अधिकारी होता.
हुशार पण डावखोरा, अतिशय क्लिष्ट माणूस. आमच्या मित्र
परिवारातील एका सुसभ्य सुसंस्कृत शिकलेल्या मुलीच्या सुनंदाच्या नशिबी तो आला.
सुनंदाच्या वडिलांनी थाटामाटात लग्न करून दिले.अगदी बोट
ठेवायला जागा ठेवली नाही. आणि सुनंदाला घेऊन शामराव
सरकारी नोकरीत जॅाईन झाला. नव्या नवलाईचे दिवस सुरू
झाले व वर्ष भरातच सुनंदाला आपण आई होणार असल्याची
चाहूल लागली . यथावकाश दिवस भरल्यावर तिच्या वडिलांनी
एका चांगल्या नामांकित दवाखान्यात बाळंतपण करवले.
सासरी माहेरी आनंदी आनंद झाला. नविनच संसार असल्यामुळे अजून तरी सुनंदाने काही तक्रार केली नव्हती.
त्यातच सव्वा वर्षातच ती पुन्हा आई होणार असल्याचे तिला
कळले व दुसराही सुंदर गोरापान गुटगुटीत मुलगाच झाला.
वाटले गंगेत घोडे न्हाले.
नाही , नाही , पण इतके सुरळीत कुठे काही चालते का?
जास्त करून सगळा सुनंदाचा खर्च माहेरची मंडळीच करत
असत.अचानक एक दिवस शामराव काळानिळा पडून आता
काय होते अशी परिस्थिती निर्माण झाली.माहेरची मंडळी
हादरली. काय झाले अचानक असे? दवाखान्याच्या फेऱ्या
सुरू झाल्या. आणि टी बी चे निदान झाले. सुनंदाच्या पाया
खालची जमिनीच सरकली. सासरचं कुत्रं फिरकायला तयार
नाही. सगळा खर्च, दवाखाना, दोन लहान मुलांचा खर्च सगळा
माहेरच्यांनी करायचा. आजार साधा नव्हता , छातीचा पिंजरा
उघडून फुफ्फुसाचे मोठे तीस चाळीस टाक्यांचे ॲापरेशन करावे लागणार होते नि हळू हळू हा शामराव अत्यंत चिडखोर
आहे हे कळले व त्याच्या तापदायक स्वभावाचे चटके सुनंदा निमूटपणे
एकटीच सोसत होती हे लक्षात आले. पण सत्य किती दिवस लपून राहणार !
तो रात्री बेरात्री त्रास द्यायचा हे सगळ्यांना कळल्यावर सगळेच
हादरले. त्यात तो गंभीर ( हो, त्या वेळी टी बी गंभीर आजार होता)
आजारी पडला व त्याचा त्रास अधिकच वाढला. त्याला एका
मोठ्या नामांकित दवाखान्यात भरती केले. त्याच्या या घाणेरड्या स्वभावामुळे त्याची आई सुद्धा दवाखान्यात रहायला
तयार नव्हती. तिला बळजबरीने आणावे लागले. सुनंदाच्या
वडिलांच्या मुलीच्या सौभाग्यासाठी धडपडी सुरू झाल्या.
अॅापरेशन सुरळीत पार पडले नि त्यांनी जावयाला घरी आणून
महिनाभर बडदास्त ठेवून तो पूर्ण बरा झाल्यावर लेकीला रवाना केले.
पण जात्याच तो विकृत स्वभावाचा असल्यामुळे व माहेरी गावात
बदनामी नको म्हणून सुनंदा मूकपणे छळ सोसत राहिली.या
घाण स्वभावामुळे ॲाफिसात ही त्याचे कधी कुणाशी जमले नाही. मी मोठा, मी शहाणा बस्स.. अर्वाच्य बोलणे , त्या मुळे
सतत त्याच्या बदल्या होत असत .त्याला लांब लांब ते लोक
फेकायचे, पण शहाणा होईल तो शामराव कसला? हे सत्र
तो निवृत्त होई पर्यंत सुरूच राहिले. मुलांच्या शाळेसाठी त्याने घर शहरातच ठेवले त्यामुळे तो लांब असायचा, सुटी घेऊन
घरी यायचा, त्यामुळे सुनंदाला थोडा मोकळा श्वास घेता येत
असे.असेच दिवस जात राहिले व तो निवृत्त होऊन घरी राहू
लागला.झाले, पहिले पंचावन्न पाढे सुरू. व सततच्या छळाने
व रडण्याचे परिणाम सुनंदावर दिसू लागले. तिला सिव्हियर
डायबिटीस झाला. तोंड दाबून बुक्क्क्याचा मार बायका सहन
करतात तो कोण काय म्हणेल म्हणूनच ! तिचे वडिल तिला म्हणत, नको राहूस त्याच्या जवळ पण माहेरी तरी संसार सुखाचा जातो का? नाही, म्हणून ती छळ सोसत राहिली व
तीन वर्ष अंथरूणाला खिळून तिने जगाचा निरोप घेतला.
कोण काय म्हणेल ? या प्रश्नाने बायकांचे जीवन नरक करून
टाकले आहे. त्रास देणारे मनमानी जगतात व बायका मात्र
होरपळतात हे कटू सत्य आहे. ही परिस्थिती आता बरीच
बदलली आहे हे जरी खरे आहे तरी मला खरे सांगा आज ही
बायकांची ससेहोलपट थांबली आहे का? त्याची कारणे ही
आपल्याला माहित आहेत तरी बदल घडतो का? आज ही
अशा कितीतरी सुनंदा शामरावचा छळ सोसत आहेत, अगदी
उच्चपदा पासून ते चतुर्थ श्रेणी कामगारांपर्यंत हीच परिस्थती
आहे हे कोण नाकारू शकेल ?
॥धन्यवाद॥
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि .२५ जून २०२२
वेळ : दुपारी १ : ११