वैभववाडी
संयुक्त बँक खात्यावरील तब्बल 23 लाख रुपयांची रक्कम संगमताने परस्पर हडप केल्याची तक्रार रिया रामचंद्र जाधव रा. भोम या मुकबधीर महिलेने वैभववाडी पोलीस ठाण्यात दिली आहे. माझा सख्खा भाऊही मतिमंद आहे. आमच्या व्यंगाचा गैरफायदा घेऊन खात्यावरुन हडप केलेली रक्कम आम्हाला परत मिळावी व आम्हाला न्याय मिळावा असे तक्रारीत रिया म्हटले आहे.
पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे की, माझी आई कल्पना विजय तळेकर ही भोम येथील आहे. परंतु ती सद्यस्थितीत मयत आहे. तिला मी व माझा भाऊ राजेश विजय तळेकर असे सरळ दोन वारस आहोत. माझ्या आईच्या नावे असलेली भोम येथील जमीन अरुणा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात गेलेली आहे. त्याचा मोबदला म्हणून शासनाकडून आम्हाला 25 लाख रुपये मंजूर झाले. दरम्यान माझा मामाने आम्हा दोन्ही भावंडांना घेऊन भुईबावडा येथील विदर्भ – कोकण ग्रामीण बँकेत गेला. तिघांच्या नावाचे संयुक्त खाते त्याने उघडले. व मोबदल्याची रक्कम या खात्यावर जमा केली. खात्यावर पैसे जमा झाल्यापासून मी आतापर्यंत एकही देवघेवीचा व्यवहार केलेला नाही. असे असताना आमच्या खात्यावरील 23 लाख 6 हजार पेक्षा जास्त रक्कम परस्पर संगनमताने काढण्यात आली आहे. मी मूकबधिर व भाऊ मतिमंद याचाच गैरफायदा घेण्यात आला आहे. तरी संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. व हडप केलेली रक्कम परत मिळावी असे तिने तक्रारीत म्हटले आहे. या अपहार प्रकरणाचा अधिक तपास वैभववाडी पोलिस करत आहेत.