जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री अख्तर पठान यांची अप्रतिम काव्यरचना
सर आली पावसाची आणि गेली वाहून,
आई तुझी आठवण मनी गेली राहून..।।
तू माझ्या छान दोन वेण्या घालायची,
सर्वांसाठी तुझी धडपड चालायची..।
मुर्ती तुझी डोळयांत आहे सामावून,
आई तुझी आठवण मनी गेली राहून..।।
मुलांच्या आनंदात दुःख विसरायची,
उत्साहाची घरात लहर पसरवायची..।
घरासाठी सारे कष्ट जायची साहून,
आई तुझी आठवण मनी गेली राहून…।।
आम्हांला नवीन वस्त्र तू जुनी नेसायची,
तरी आम्हासवे खळखळून हसायची..।
तृप्तिचा ढेकर देई शिळ पाकं खावून,
आई तुझी आठवण मनी गेली राहून..।।
कशाची कधी तुला अपेक्षा नसायची,
सगळे पलंगावर तू खाली बसायची..।
इतरांना झोपवायची तू जागी राहून,
आई तुझी आठवण मनी गेली राहून..।।
उपाशी राहून तू आम्हा चारला मेवा,
आम्हांला तुझी करता आली नाही सेवा..।
देवादिकांना सुद्धा आई तू गेली भावून,
आई तुझी आठवण मनी गेली राहून..।।
तुझे उपकार आता सांग कसे फेडायचे,
ईश्वराचे रूप तू तुला हात जोडायचे..।
पांग तुझे फेडावे कवन तुझे गावून,
आई तुझी आठवण मनी गेली राहून..।।
✍🏻 *अख़्तर पठाण*
*(नासिक रोड)*
*मो.:-9420095259*