You are currently viewing एकसंघ होऊन सिंधुदुर्ग जिल्हा भयमुक्त करूया- ब्रि. सुधीर सावंत

एकसंघ होऊन सिंधुदुर्ग जिल्हा भयमुक्त करूया- ब्रि. सुधीर सावंत

श्रीधर नाईक यांचा समाजकार्यातील निष्ठेचा वारसा जोपासणार -आ. वैभव नाईक

कणकवलीत कै. श्रीधरराव नाईक यांचा ३१ वा स्मृतिदिन साजरा

मिलेट्रीत असताना शत्रूशी लढावे लागले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात आल्यानंतर देखील गुंडांशी लढावे लागले. त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्हयात गुंडांची दहशत पसरली होती. जिल्हयात श्रीधरराव नाईक यांनी मोठे संघटन उभे केल्याने काहींना अस्तित्वाची भीती निर्माण झाली आणि त्यातून श्रीधर नाईक यांची हत्या झाली.आज ३१ व्या स्मृतिदिनी आपण श्रीधर नाईक यांच्या स्मृतींना उजाळा देत आहोत. इतक्या वर्षांनंतरही आज इथे जमलेला संघ कोणताही पक्ष म्हणून जमलेला नाही.तर श्रीधर नाईक यांच्या प्रेमापोटी जमला आहे. आपण सर्वांनी एकसंघ होऊन जिल्ह्यातील दहशती विरोधात येत्या काळातही लढले पाहिजे. एकसंघ होऊन सिंधुदुर्ग जिल्हा भयमुक्त केला पाहिजे.काहींनी गद्दारी केली आहे. जरी नेते इतर पक्षात गेले तरी कार्यकर्ते पक्षातच राहतात त्यामुळे पुढील कळातही शिवसेनेला नेत्रदीपक विजय मिळेल, तसेच आ. वैभव नाईक देखील मंत्री होतील असा विश्वास माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी व्यक्त केला.


कै. श्रीधरराव नाईक यांचा ३१ वा स्मृतिदिन आज कणकवली येथील कै. श्रीधरराव नाईक चौक येथे साजरा करण्यात आला. ब्रिगेडियर सुधीर सावंत, आमदार वैभव नाईक, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, कोकण पर्यटन विकास समितीचे उपाध्यक्ष संदेश पारकर, शिवसेना नेते गौरीशंकर खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत कै. श्रीधरराव नाईक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. यानिमित्ताने रक्तदान शिबीर व मोफत मोतीबिंदू तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.
याप्रसंगी महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, नीलम पालव, प्रसाद रेघे, उपजिल्हाप्रमुख राजू शेटये, बाळा भिसे, नागेंद्र परब, अमरसेन सावंत, जयभारत पालव, शैलेश भोगले, प्रथमेश सावंत,युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, शेखर राणे, तुळशीराम रावराणे, अरुण भोगले, भालचंद्र मेस्त्री गुरुजी, श्री. गावडे, मुरलीधर नाईक, सतीश नाईक, संकेत नाईक, दादा कुडतरकर, अवधूत मालणकर, आबा दुखंडे, श्री. कोदे,राजू राणे, सचिन आचरेकर,बाळू मेस्त्री, बाळू पालव, भूषण परुळेकर,मानसी मुंज, प्रतीक्षा साटम, दिव्या साळगावकर,प्रशांत वनस्कर, उत्तम सुद्रीक आदींसह मोठ्या संख्येने श्रीधर नाईक प्रेमी उपस्थित होते.

*श्रीधर नाईक यांचा समाजकार्यातील निष्ठेचा वारसा जोपासणार -आ. वैभव नाईक*

आ. वैभव नाईक म्हणाले, कै. श्रीधरराव नाईक यांचे विचार, त्यांचे कार्यकर्तृत्व आजच्या तरुण पिढीला आत्मसात व्हावे या हेतूने गेली ३१ वर्षे त्यांचा स्मृतिदिन साजरा करत आहोत. श्रीधर नाईक संकट काळात नागरिकांच्या मदतीला धावून जात होते. त्यामुळे श्रीधर नाईक यांची वाढती लोकप्रियता हि काहींना अडचण ठरत होती. त्यामुळे त्यांना संपण्यात आले. मात्र श्रीधर नाईक यांच्या विचारांनी या अपप्रवृत्तीला पराभूत करण्याचे काम केले आहे.श्रीधर नाईक यांच्या विचारांवर आम्ही सर्वजण चालत असून कितीही आमिषे आली तरी श्रीधर नाईक यांचा समाजकार्यातील निष्ठेचा वारसा जोपासणार असल्याचे आ. वैभव नाईक यांनी याप्रसंगी सांगितले

*श्रीधर नाईक यांच्यासारखे बनू शकत नाही, परंतु त्यांच्यासारखे जगू शकतो- गौरीशंकर खोत*

गौरीशंकर खोत म्हणाले, राजकारणात लोक काहीही करू शकतात. त्यावेळी देखील गैरमार्गाने सत्ता मिळविण्यासाठी श्रीधर नाईक यांची हत्या करण्यात आली. श्रीधर नाईक हे महान नेतृत्व होते. त्यांचे विचार अमर आहेत. आपण त्यांच्यासारखे बनू शकत नाही, परंतु त्यांच्यासारखे जगू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने जमेल तेवढे समाजकार्य करणे गरजेचे आहे. समाजाला कधीच विसरून चालणार नाही. जे समाजाला विसरले ते आपली पत घालवून बसले आहेत. असे सूचक वक्तव्य गौरीशंकर खोत यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर केले.

*जोपर्यंत चंद्र, सूर्य आहेत तोपर्यंत श्रीधर नाईक अमर आहेत- संदेश पारकर*

संदेश पारकर म्हणाले, श्रीधर नाईक हे लोकमान्य नेतृत्व होते. त्यावेळी काँग्रेसची संघटना वाढीसाठी त्यांनी मेहनत घेतली. श्रीधर नाईक असेपर्यंत नारायण राणेंची राजकीय पोळी भाजत नसल्याने राणेंनी भाडोत्री गुंड पाठवून श्रीधर नाईक यांची हत्या केली. हि दुर्दैवी घटना होती. मात्र आ. वैभव नाईक यांनी राणेंचा पराभव करून सूड उगवला. श्रीधर नाईक यांचे विचार मोलाचे आहेत. त्यांच्या विचारांवर काम केल्यास कोणत्याही संकटावर मात करू शकतो. सुशांत नाईक हे देखील त्यांच्या विचारावर कार्य करत आहेत.श्रीधर नाईक यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही जोपर्यंत चंद्र, सूर्य आहेत तोपर्यंत श्रीधर नाईक अमर आहेत.असे संदेश पारकर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा