You are currently viewing आरोग्य कर्मचाऱ्यांचे नगरपरिषद प्रवेशद्वारासमोर थाळी वाजवा आंदोलन

आरोग्य कर्मचाऱ्यांचे नगरपरिषद प्रवेशद्वारासमोर थाळी वाजवा आंदोलन

आंदोलकांकडून प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी

इचलकरंजी :

 

इचलकरंजी नगरपरिषद प्रशासनाकडून कोरोना महामारीच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणा-या नागरी आरोग्य प्राथमिक केंद्रातील कर्मचाऱ्यांना ८ महिन्यांचा थकीत कोरोना प्रोत्साहन भत्ता देण्यास टाळाटाळ केली जात आहे.प्रशासनाच्या या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ आज मंगळवारी सर्व श्रमिक संघाच्या वतीने कर्मचाऱ्यांनी नगरपरिषदेच्या प्रवेशद्वारासमोर थाळी वाजवा आंदोलन केले.यावेळी आंदोलकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणा देत थाळीचा आवाज घुमवत परिसर दणाणून सोडला.

कोरोना महामारीच्या काळात इचलकरंजी शहरातील नागरी आरोग्य प्राथमिक केंद्रातील कर्मचाऱ्यांनी मोठी जोखीम पत्करून आपले कर्तव्य बजावले आहे. त्यामुळे ६८ कर्मचाऱ्यांना ९ महिन्यांचा प्रति महिना ३ हजार रुपये याप्रमाणे कोरोना प्रोत्साहन भत्ता देण्याचा ठराव नगरपरिषद कौन्सिल सभेत करण्यात आला. त्यानुसार यातील एक महिन्याची भत्याची रक्कम मागील नोव्हेंबर महिन्यात संबंधित कर्मचाऱ्यांना अदा करण्यात आली आहे. परंतू, यातील उर्वरित ८ महिन्यांची सुमारे १६ लाख ३२ हजार रुपयांची कोरोना प्रोत्साहन भत्त्याची थकीत रक्कम अद्याप मिळालेली नाही.

याबाबत इचलकरंजी नगरपरिषद प्रशासनाकडून टाळाटाळ करत आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न होत असून महिला कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचा आरोप सर्व श्रमिक संघाने केला आहे. कोरोना महामारीच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्काच्या मागणीला नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल हे बेदखल करुन त्यांच्यावर अन्याय करत असल्याच्या निषेधार्थ सर्व श्रमिक संघाच्या वतीने आज मंगळवारी नगरपरिषद प्रवेशद्वारासमोर थाळी वाजवा आंदोलन करण्यात आले.यामध्ये नागरी आरोग्य प्राथमिक केंद्रातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होत त्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणा देत थाळीचा आवाज घुमवत परिसर दणाणून सोडला.

यावेळी सर्व श्रमिक संघाचे उपाध्यक्ष धोंडीबा कुंभार यांच्यासह काही महिला कर्मचाऱ्यांनी प्रशासनाकडून होत असलेल्या अन्यायाची माहिती देवून न्याय मिळेपर्यंत लोकशाहीच्या मार्गाने हा लढा सुरुच राहिल ,असा प्रशासनाला इशारा दिला. या आंदोलनात सर्व श्रमिक संघाचे संघटक सुनील बारवाडे , उज्वला बारवाडे ,योगिता निऊंगरे ,श्रीदेवी शेलार ,प्रिती उरुणकर , अर्चना पाटील ,धनश्री भोजकर ,स्वाती देसाई ,प्रतिक्षा साबळे ,रेश्मा पोवार ,अनुजा जोशी ,उत्कर्षा कांबळे ,कौसर बाणदार यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा