You are currently viewing योग्य तपास करुन मालवण शहरातील घरफोडयांचा छडा लावावा

योग्य तपास करुन मालवण शहरातील घरफोडयांचा छडा लावावा

भाजपा उद्योग व्यापार आघाडीचे मालवण पोलीस निरीक्षकांना निवेदन

मालवण :

मालवण शहरात भर बाजारपेठेत झालेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी योग्य तो तपास करून या घरफोडीचा छडा लावावा, अशी मागणी भाजपा उद्योग व्यापार आघाडीतर्फे रविवारी मालवणचे पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

मालवण शहरात बाजापेठेत तसेच भरवस्तीच्या ठिकाणी एकूण पाच घरात घरफोडी होऊन लाखोंचा ऐवज चोरट्यानी लंपास केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप उद्योग आघाडीतर्फे मालवण पोलीस ठाण्यात निवेदन सादर करून चोरीचा तपास करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी भाजप उद्योग व्यापार आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, गणेश कुशे, अभय कदम, प्रमोद करलकर, तेजस नेवगी, पंकज पेडणेकर, सुनील बागवे, विकी फर्नांडिस, नरेंद्र जामसंडेकर आदींसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

मालवण शहरात भर बाजारपेठेत घरफोडी होऊन चोरी होणे ही गंभीर गोष्ट आहे. पोलिसांनी याची दखल घ्यावी. सदर चोर हा मालवणातील माहितगार असून चोरीपूर्वी त्याने बंद घरांची रेकी केल्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसणारी व्यक्ती तसेच स्थानिक नागरिकांना पहाटे दिसलेली संशयास्पद व्यक्ती व इतर उपलब्ध माहितीच्या आधारे पोलिसांनी योग्य तो तपास करून या चोरीचा छडा लावून चोराला गजाआड करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

शहरात बाजारपेठ व वस्तीच्या ठिकाणच्या रस्त्यांवरील स्ट्रीट लाईट बंद असल्याने चोरांना त्याचा फायदा होत आहे. त्यामुळे सर्व स्ट्रीटलाईट चालू अवस्थेत असणे महत्वाचे आहे. याबाबत नागरिक व भाजपने वीज अधिकाऱ्यांचे वेळोवेळी लक्ष वेधुनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे पोलिसांनी यात जातिनिशी लक्ष घालून वीज वितरण कार्यालयास योग्य त्या सूचना कराव्यात. तसेच शहरात रात्रीची पोलीस गस्त व बंदोबस्तही वाढविण्यात यावा. आवश्यक ते सहकार्य भाजपा उद्योग – व्यापार आघाडी पोलिसांना सहकार्य करेल, असेही यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावर पोलीस निरीक्षक विजय यादव यांनी योग्य ती कार्यवाही करण्याची ग्वाही दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा