सिंधुदुर्गनगरी
शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळातर्फे इतर मागास घटकांसाठी 20 टक्के बीज भांडवल, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा, गट कर्ज व्याज परतावा 1.00 लाख रुपयांपर्यंतची थेट कर्ज योजनांतर्गत महामंडळाकडून खालील योजना राबविण्यात येतात.
या योजनांची माहिती पुढीलप्रमाणे आहे.
बीज भांडवल कर्ज योजना – या योजनेत कर्ज मर्यादा रु. 5 लाख असून कर्जाची मुदत 5 वर्ष आहे. योजनेमध्ये महामंडळाचा सहभाग 20 टक्के, बँकेचा सहभाग 75 टक्के व लाभार्थीचा सहभाग 5 टक्के असतो. महामंडळाच्या कर्ज रकमेवर द.सा.द.शे. 6 टक्के व्याज आकारले जाते व बँकेच्या कर्ज रकमेवर बँकेच्या नियमानुसार व्याज आकारले जाते. याकरिता लाभार्थ्याचे वय 18 ते 50 वर्ष असावे. उमेदवाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपये असणे गरजेचे आहे. या योजनचे अर्ज जिल्हा कार्यालयाकडे उपलब्ध आहेत.
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना – या योजनेत कर्जाची मर्यादा 10 लाख रुपये असून ही योजना ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येते. कर्जाचे हप्ते वेळेत भरल्यास 12 टक्के व्याजरकमेच्या प्रमाणे व्याजाचा परतावा मिळणार आहे. उमेदवाराचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपये असणे आवश्यक आहे. यासाठी लाभार्थीचे वय 18 ते 50 वर्ष असावे. महाराष्ट्रातील रहिवासी असल्यासचा पुरावा आवश्यक आहे. योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने www.msobefde.org या महामंडळाच्या संकेतस्थळावर व्याजपरतावा मध्ये नाव नोंदणी करून सादर करावयाचा आहे. कर्जाची परतफेडीचा कालावधी 5 वर्षे असणे आवश्यक आहे.
गट कर्ज व्याज परतावा योजना – या योजनेची मर्यादा 50 लाख रुपये पर्यंत आहे. गटातील व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. योजनेचा लाभ बचत गट, भागीदारी संस्था, सहकारी संस्था कंपनी यांना लाभ घेता येईल. कर्जाची मर्यादा 10 लाख रुपये ते 50 लाख एवढी असून,योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने www.msobefde.org या महामंडळाच्या संकेतस्थळावर व्याजपरतावा मध्ये नाव नोंदणी करून सादर करावयाचा आहे.
थेट कर्ज योजना – या योजनेत कर्जाची मर्यादा 1 लाख रुपये असून मुदत 4 वर्ष आहे. महामंडळाकडून ही योजना बिनव्याजी असून मुदतीत कर्ज न भरल्यास द.सा.द.शे. 4 टक्के व्याजदर आकारण्यात येतो. या योजनेसाठी वार्षिक उत्पन्नाची अट रु 1 लाख आहे. तसेच अर्जदाराचा सिबील स्कोर कमीत कमी 500 असणे आवश्यक आहे. या योजनचे अर्ज जिल्हा कार्यालयात उपलब्ध आहेत.
ज्या गरजू उमेदवारांना या योजनांचा लाभ घेऊन नवीन व्यवसाय किंवा सुरू असलेला व्यवसाय वाढ करायचा आहे, त्यांनी शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ, सिंधुदुर्गनगरी येथे दूरध्वनी क्र. – 02362-228119 येथे संपर्क साधावा असे प्रसिध्दीप्रत्रकाव्दारे कळविले आहे.