जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच… लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्य लेखक कवी दीपक पटेकर यांची अप्रतिम काव्यरचना
*वृत्त पादाकुलक*
*खरेखोटे भाव*
मनातले मी खरे सांगतो
आव फुकाचा का आणावा
चेहऱ्यावरी खोटे हसणे
खरेपणाचा करील दावा?
खरे बोलणे कठीण झाले
तरी चांगले नव्हे खोटे
सत्य बोलता तुटती नाती
सत्याचे ते बरेच तोटे
अनेक दिसती रस्तोरस्ती
मुखी एक अन् दुजा चेहरा
आप्तजनांशी सुखी पाहुनी
भाव मनाशी ठेविती खुजा
खऱ्यास नाही जगात वाली
खोट्याचाही दर वधारतो
कितीक केल्या इथे वल्गना
तरी कुठे हा जन सुधारतो
कित्येकांचे अश्रू गळती
नित्याचा तो सराव आहे
पाघळणाऱ्या त्या हृदयाचा
जगात आता अभाव पाहे
कुठे कोण ते घेउनि जातो
इथेची रिते हस्त सांडतो
बरी नव्हे ती हाव कशाची
लेखा जोखा देव मांडतो
जमेल तेव्हा पहा अंतरी
दोष आपुले शोधा आपण
सद्गुण नसता अंगी मनुजा
का ते देती उगा देवपण?
©[दीपि]
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६