*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ.अनीता व्यवहारे यांचा अप्रतिम लेख*
🙏 *प्रार्थनेचे बदलते स्वरूप* 🙏
*दिवा पाहुनी लक्ष्मी येते करू तिची प्रार्थना*
*शुभंकरोती म्हणा मुलांनो शुभंकरोती म्हणा..* 🙏🙏
आपण लहान असताना आपल्या आई-वडिलांनी आपल्या कडून देवासमोर बसवून म्हणून घेतलेल्या प्रार्थनेत देवाकडे सर्वांच्या सुखासाठी, सर्वांना चांगली बुद्धी मिळावी, स्वास्थ्य मिळावं असं मागणं असायचं. या प्रार्थनेतून सर्वात्मक असलेल्या परमेश्वराची विविध रूपं, या रूपातून तो आपल्या हाकेला धावून येणारा हे सर्व आपल्याला माहित असायचं देव तेहतीस कोटी आहेत पण ती एकाच परमेश्वराची रुप आहेत हे माहीत असतानाही प्रत्येक देवाकडे वेगवेगळ्या प्रार्थना आपण करत असायचो. *सर्वात्मका शिवसुंदरा तिमिरातुनी तेजाकडे ने आमच्या जीवना*
या प्रार्थनेतला आशय तेव्हा कळायचा नाही. पण आता ज्ञान वाढलं, वय वाढलं अनुभवही वाढू लागला… *अंधारातून प्रकाशाकडे ने म्हणजे दुखा कडून सुखाकडे ने*
*असो तुला देवा माझा सदा नमस्कार..*
*तुझ्या दया दातृत्वाला अंत नाही पार*
म्हणजे परमेश्वर दयाळू आहे..देणारा आहे…आपली दुःख दूर करून सुखाचे दिवस दाखविणारा एकमेवद्वितीय आहे.हे समजत..
*तुम्ही हो माता पिता तुम्ही हो तुम्ही हो बंधु सखा तुम्ही हो..*
परमेश्वर आपलं सर्वस्व आहे त्याच्याशिवाय आपलं जीवन म्हणजे आपलं विश्व हे जणू शून्य आहे. त्याच्याशिवाय आपलं अस्तित्वच असणार नाही.. याची जाणीव ठेवून कितीही संकटे आली तरी घाबरायचं नाही. काही झालं तरी देवच आपल्याला यातून मार्ग दाखवणार हे लहान असताना कळत होतं.
. *तुझ्या कृपेने होतील फुले पत्थरांची*
*तुझ्या कृपेने होतील मोती मृत्तिकेची*
* *तुझ्या कृपेने होइल पंगू सिंधू पार*
यातून देव किती महान आहे हे सांगायची, त्याचा विचार, विस्तार करायची गरज पडत नव्हती असा हा महनीय देव पाठीशी असेल तर कुणाला आणि का घाबरायचं असा प्रश्न पडतो?
प्रार्थना करणा म्हणजे आईनं सांगितलं म्हणून देवापुढे हात जोडून बसायचं आणि खेळायला मिळेल या उद्देशाने एक चित्तानं आई सांगेल ते म्हणायचं.
मोठा झाल्यावर आईने न सांगता संकट आली की देवापुढे बसायचं एक चित्त व्हायचं (हे सर्वात महत्त्वाचं) आणि या संकटातून मार्ग दाखव म्हणून केलेली उपासना हे कळायला लागलं. पण अलीकडे जग बदललं, प्रार्थना बदलल्या, प्रार्थनास्थळ बदलली. पूर्वी देवघरात, देवाच्या मंदिरात हात जोडून बसायचं मांडी घालायची पूजाअर्चा करायची आणि मग प्रार्थना म्हणायची. पण आता कधीही कुठेही प्रार्थना केली जाते. वेळ काळ, स्थळ असं काही राहिलं नाही.
आता अलीकडे फोनवर एकच रिंगटोन ऐकायला येते
*हीच आमुची प्रार्थना अन हेच आमचे मागणे*
*माणसाने माणसाशी माणसासम वागणे*
ऐकलं की छान वाटतं… अरे आता आपण सुधारलो… माणसाने माणसाशी माणसा सारखं वागायचं म्हणजे माणुसकी, मानवता अंगी बाळगायची. मानवाचा धर्म पाळायचा. पण तो धर्म समजला का आपल्याला? कारण अजूनही बहिणाबाई म्हणतात तसेच आहोत
आपण.. त्या म्हणतात,
*माणसा माणसा कधी होशील माणूस*
*लोभासाठी झाला माणसाचा कानुस*
असं असताना त्याच्या सारखं वागायचं म्हणजे
*मतलबासाठी मान मानुस डोलये*
*इमानासाठी कुत्रा शेपूट हालये*
असं काहीस…. पण नाही, आता हे बदलत चाललय. कोरोना सारख्या अजब महामारीने माणसाला माणूस म्हणून जगायला
शिकवलय..
*शोधिसी मानवा राउळी मंदिरी*
*नांदतो देव हा आपुल्या अंतरी.*.
असा हा देव माणसांच्या मनात, हृदय मंदिरात वास्तव्याला येऊ लागला आहे. अस्मानी-सुलतानी संकटात आता माणूस माणसांसाठी देवासारखा धावून येतो आहे. खराखुरा देव पाहण्याचे भाग्य आपल्या नशिबात नव्हतं पण आता माणसातले देव आपल्याला दिसू लागले आहेत. मग ते फक्त डॉक्टर, परिचारिका, पोलिस… अशा कर्मचाऱ्यांच्या रूपात नव्हे तर अगदी सर्वसामान्य माणसातही देव दिसत आहे..कोरोनामुळे घेणाऱ्या इतके देणाऱ्याचे ही हात आता वाढू लागले आहेत.. शरीराने दूर जाऊ लागलेली माणसं मनाने जोडली जाऊ लागली आहेत. त्यासाठी नात्याच्या कनेक्शन ची गरज राहिली नाही. जिथे दिसेल तिथे हवी असेल त्याला माणसं मदत करू लागली आहेत.
*सोता झाला रे दगड*
*घाव टाकीचा सोसला*
*अरे दगडात त्याला*
*देव दिसला*
*परी आज तो माणसात आला*
या दगडातला देव माणसात आला ही खूप मोठी भाग्याची गोष्ट घडली.. माणसाला त्याच्या चुका समजल्या…
निसर्गाच्या बाबतीत ही हेच घडले.. निसर्गाला देव मानणारा माणूस त्या देवाशी चुकीचा वागत होता. पण पुन्हा एकदा
*वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे*
म्हणत पुन्हा निसर्गाचा पूजक बनला..जेव्हा जगायला ऑक्सिजनची कमतरता भासू लागली, पैसे देऊनही तो मिळत नाही तेव्हा मानवाच्या लक्षात आलं की, झाडं लावली पाहिजेत.
*झाडे लावा झाडे जगवा* या कोरड्या घोषवाक्यात ओलावा निर्माण झालाय. माणूस माणसाला सांगू लागला *अरे आता एक तरी झाड लावू या*
जागतिक संकटामुळे का होईना दगडातला देव माणसात आला. त्याचे महत्त्व त्याला कळले. मंदिराचे दरवाजे बंद झाल्यामुळे खऱ्या देवाला आपल्यापर्यंत पोहोचत येईना आणि म्हणूनच त्यांनी त्याची रुपे आता देह मंदिरात समाविष्ट केली आहेत.
नुकतीच व्हाट्सअप ला एक पोस्ट वाचली त्यात छान म्हटलं कुणीतरी..
*प्रार्थना म्हणजे हात जोडून गुडघ्यावर बसून देवाकडे काहितरी मागणं नव्हे तर सकारात्मक विचार करून लोकांसाठी*
*काहीतरी इच्छा मनी* बाळगणे,* *दुसऱ्याला मदत करणे, माफ करणं म्हणजे प्रार्थना होय..*
*प्रार्थना म्हणजे प्रेमाचा आवाज*
अशी प्रार्थना आपण सर्वांनी करू या. काही माणसांच्या मन मंदिरात देव येऊन राहिलाआहे. तुम्ही आम्ही पण आपल्या मंदिराचा एक कोपरा स्वच्छ करून ठेवायला सुरुवात करूया आणि म्हणू या
*देह मंदिर चित्त मंदिर*एक तेथे प्रार्थना*
*सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना*
अशा या प्रार्थनेतून लवकरच मानवतेच्या एकतेची कल्पना पूर्ण होईल आणि स्वर्गातले तेहतीस कोटी देव या पृथ्वीवरच्या माणसांच्या मनात वास्तव्याला येतील.
आणि
*इवल्या इवल्याशा टिकल्या टिकल्यांचे देवाचे घर बाई उंचावरी*
म्हणायच्या ऐवजी आपण म्हणूया
*हिरव्या हिरव्या धरती मातेच्या कुशीत*
*आहे देवाचे घर*
*माणसाच्या मनात.*.,
*सौ अनिता व्यवहारे*
*ता श्रीरामपूर जि अहमदनगर*