मालवण
मालवणमधील यशस्वी उद्योजिका मेघा सावंत यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चरच्या महिला उद्योजक समितीवर कोकण विभागासाठी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. कुडाळ येथील चेंबरच्या महिला उद्योजकता विकास परिषदेच्या वेळी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
मेघा सावंत यांनी गेली १५ वर्षे हॉटेल व्यवसायात आपले स्थान निर्माण केले असून फुड प्रोसेसिंग क्षेत्रात त्यांचे विविध प्रयोग सुरु असतात. ग्रामीण भागातील महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टीने सतत विविध उपक्रम राबवित असतात. त्या सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन महासंघाच्या पदाधिकारी असून त्या माध्यमातून हॉटेल आणि पर्यटन व्यावसायिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आग्रही असतात. याची दखल घेत समितीच्या चेअरमन संगिता पाटील यांनी त्यांची सदस्य म्हणून निवड केली.
याप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, मासियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले, जिल्हा बँकेच्या संचालिका सौ. प्रज्ञा ढवण, सावंतवाडी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा आणि उद्योजिका सौ. अन्नपूर्णा कोरगावकर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या महिला उद्योजक समितीच्या चेअरमन सौ. संगीता पाटील, व्हा. चेअरमन सौ कविता देशमुख, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स कोकण उपाध्यक्ष चंद्रशेखर पुनाळेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे नियोजन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या कोकण विभाग जीसीसी मेंबर यांच्या मार्फत करण्यात आले होते. या निवडीबद्दल आणि पुढील वाटचालीसाठी कोकण विभाग उपाध्यक्ष चंद्रशेखर पुनाळेकर आणि जीसी मेंबर्स भालचंद्र राऊत, •अशोक सारंग, महेश मांजरेकर, मनोज वालावलकर यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.