You are currently viewing जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते उद्यमिता यात्रेचे स्वागत

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते उद्यमिता यात्रेचे स्वागत

तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचेही उद्घाटन

सिंधुदुर्गनगरी

 महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास विभाग, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी आणि युथ एड फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेली राज्यव्यापी उद्यमिता यात्रा आज कुडाळ येथे पोहचली. जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी या उद्यमिता यात्रेचे स्वागत केले. तसेच पंचायत समिती कुडाळच्या सभागृहात तीन दिवसीय व्यवसाय विकास प्रशिक्षण उपक्रमाचे उद्घाटन ही करण्यात आले.

            यावेळी युथ एड फाउंडेशनचे अध्यक्ष मॅथ्यू मत्तम, जिल्हा व्यवसायिक शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी रमण पाटील, कोकण कला आणि शिक्षण विकास संस्था अध्यक्ष दयानंद कुबल, गट विकास अधिकारी विजय चव्हाण, नगरसेविका संध्या तेरसे, जिल्हा कौशल्य विकास रोजगार, व उद्योजकता विभाग सिंधुदुर्गच्या प्रतिनिधी व महात्मा गांधी नॅशनल फेलो शिवानी गरड आदी उपस्थित होते.

            मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर श्री. मत्तम यांनी उद्यमिता यात्रेची पाहुण्यांना ओळख करून दिली व प्रशिक्षणार्थींना व्यवसाय विकास मार्गदर्शन केले.

            जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी म्हणाल्या, कोकणातील लोक प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर मुंबई व इतर ठिकाणी जातात. त्यामुळे येथील स्थानिक व्यवसाय वाढले नाहीत. परंतु कोरोना महामारीनंतर चित्र बदलले आहे. स्थलांतर कमी झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात व्यवसाय वाढवण्यासाठी हीच योग्य वेळ आहे.

            या प्रसंगी कौशल्य विकास आरखड्यास केंद्र सरकारचा दुसरा उत्कृष्ट आराखडा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल कोकणवासियांच्या वतीने कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच रोजगार व स्वयंरोजगाराच्या माहिती आणि नोंदणीसाठी आत्मनिर्भर ॲपचे अनावरण करण्यात आले.

जिल्हा उद्योग केंद्र व सर्व आर्थिक विकास महामंडळालाचे जिल्हा समन्वयक यांनी ही प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.

       उद्घाटन प्रसंगी सुमारे 100 प्रशिक्षणार्थी उपस्थितीत होते. महिला , तरुण आणि तरुणींची उपस्थितीत मोठी होती. युथ एड फाउंडेशनचे तज्ज्ञ प्रशिक्षक अमित तिखाडे पुढील तीन दिवस व्यवसाय विकास प्रशिक्षण देणार आहेत. उद्घाटन समारंभ संपन्न करण्यासाठी कोकण कला आणि शिक्षण विकास संस्थचे देवानंद कुबल, प्रथमेश सावंत, अजिंक्य शिंदे, सूरज कुबल, प्रदीप पवार, अवंती गवस, समीर शिर्के, कुणाल चव्हाण, नारायण परब, साहिल कुबल, सागर कुबल, प्रदीप कुबल, अविनाश पराडकर, प्रसाद परब, मुरादअली शेख यांचे विशेष सहकार्य लाभले.

       दुपारी उद्यमिता यात्रेच्या टीमने आयटीआय ओरोस येथे भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या व्यवसाय विकास मार्गदर्शनामध्ये  श्री मत्तम , मनोज भोसले व अमोल राजपूत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. श्री. भोसले यांनी विद्यार्थ्यांना व्यवसायाचे महत्व अधोरेखित केले. श्री. राजपूत यांनी छोट्या व्यवसायापासून सुरुवात करा असे आवाहन केलें. तर श्री.मॅथ्यू यांनी विद्यार्थ्यांना कौशल्याचे महत्व सांगत उद्योग करण्यासाठी प्रोत्साहित केले.

आय टी आय चे गट निर्देशक श्री. गवस, शिक्षक व विद्यार्थी कार्यक्रमास उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा