ओरोस :
सिंधुदुर्ग जिल्हा कृषि प्रतिष्ठान, किर्लोस या संस्थेशी सलग्न असणारे कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती शिवाजी कृषि महाविद्यालय तसेच कृषि विभाग, वनविभाग, शासकीय संस्था, स्वयंसेवी संस्था, राष्ट्रीय सेवा योजना, नॅशनल कॅडेट कोर्से, देवगड कॉलेज, सैनिक फेडरेशन, इत्यादी संस्थांच्या सहकार्यातून १ जुलै पासून वृक्ष लागवड अभियान राबविण्यात येणार आहे. त्यासाठी नियोजन बैठक माजी खासदार ब्रिगे. सुधीर सावंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी यांच्या सोबत व निवासी जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
वृक्ष वातावरणातील कार्बनडायऑक्साईड शोषून घेतात व मानवाला आवश्यक असलेला ऑक्सिजन (प्राणवायू) प्रदान करतात. जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी वृक्ष लागवड महत्वाची बाब आहे. त्यामुळे यापुढे व्यापक बैठक घेऊन वृक्ष लागवडीची योजना यशस्वी करण्याचे ठरले आहे. या सभेत फळझाडे व वनझाडे सरकार कडून मिळतीलच तसेच काही नर्सरी मालकांनी सुद्धा फळझाडे देण्याचे कबुल केले आहे. त्याशिवाय कृषि महाविद्यालय १५ गावात पाच – पाच विद्यार्थी पाठवून प्रत्येक गावांमध्ये १०० ते २०० झाडे लावून घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करणार आहेत.
त्याशिवाय मराठा लाईफ इंफ्रंट्रीच्या कुडाळ येथील जमिनीमध्ये २००० फळझाडे कृषि महाविद्यालय लावणार आहे. ब्रिगे. सुधीर सावंत हे समृद्ध आणि आनंदी गाव प्रकल्पाचे जनक आहेत. त्यांनी नैसर्गिक शेतीची चळवळ देशभर उभी करून त्याला केंद्र शासनाची मान्यता मिळविली आहे.
ब्रिगे. सुधीर सावंत यांच्या संकल्पनेतून वृक्ष लागवड अभियान राबविण्यात येणार आहे. यावर्षी दहा हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सदर मोहीम १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत राबविली जाणार आहे. वन्य प्राण्यांच्या संवर्धनासाठी व जैव विविधता संवर्धनासाठी डोंगर भागामध्ये मोठ्या प्रमणात स्थानिक फळ झाडांची लागवड करण्यात येणार आहे. मनुष्य आणि निसर्ग यांचे अतूट नाते आहे. पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण व त्याचे संवर्धन आहे, असे ब्रिगे सुधीर सावंत म्हणाले.
कृषि प्रतिष्ठानची प्रक्षेत्रे, गावातील सार्वजनिक जमिनी, चराऊ – कुरणे, शाळा परिसर, महाविद्यालय परिसर, मंदिर परिसर, शेताचे बांध, रस्ते दुतर्फा, तलाव परिसर, घराकडील परसबाग इत्यादी ठिकाणी उपयुक्त झाडांची लागवड करण्यात येणार आहे. ही लोकांची चळवळ आहे. म्हणून समाजातल्या सर्व घटकांनी या मोहिमेमध्ये उत्स्फुर्तपणे भाग घ्यावा आणि जास्तीत जास्त झाडे लावावीत व टिकवावीत असे आवाहन ब्रिगे. सुधीर सावंत यांनी केले आहे.