मुंबई :
मुंबईत उपनगरीय रेल्वे प्रवासात रेल्वे प्रवाशी भजन मंडळ हा एक औत्सुक्याचा विषय…! सकाळी घरातून धावाधाव करून कामावर जाण्याच्या गडबडीत निघणारी चाकरमानी मंडळी दिवसाची सुरुवात रेल्वे प्रवासाचा शीण जाणवू नये म्हणून रेल्वे प्रवासादरम्यान भजन गाऊन देवाच्या नावाने करतात. अशाच सकाळी ९.४५ वाजता सुटणारी घाटकोपर लोकल मध्ये श्री विठ्ठल रखुमाई भजन मंडळ, घाटकोपर मंडळाचे मार्गदर्शक तसेच उत्तम कोरस साठी पहाडी आवाज म्हणून ज्यांची सेंट्रल लाईन मध्ये ख्याती होती अशा हरहुन्नरी भजनी कलाकार श्री.रवींद्र तिवरेकर माऊलींचे दिनांक १० जून रोजी सकाळी ९.०० वा. मशीद बंदर येथे रेल्वे अपघातातच दुःखद निधन झाले.
विठ्ठल भक्तीची…भजन, नामस्मरणाची ओढ असणारे सतत हसतमुख मनमिळावू व्यक्तिमत्त्व भविष्यात रेल्वेप्रवासात पुन्हा कधीच भजन गाताना दिसणार नाही याची सर्वानाच खंत वाटते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडाघाट, कणकवली तालुक्यातील ते मूळ रहिवासी होते. रवींद्र तिवरेकर यांचा पहाडी आवाज होता, त्यामुळे त्यांच्या जाण्याने भजन मंडळातील त्यांची उणीव कोणीही भरून काढणार नाही. नोकरी आणि रेल्वे भजन मंडळ यांचं टाइमटेबल ही तारेवरची कसरत असायची. सर्वाचा योग साधने सहज शक्य नव्हते, परंतु या माउलींनी ऑफिसमध्ये बॉस चा ओरडा खाल्ला पण कधीही भजन चुकवले नाही. अशी निस्सीम भक्ती परमेश्वर आणि आपल्या भाजनावर होती.
श्री.रवींद्र तिवरेकर यांच्या पश्चात पत्नी आणि शाळेत शिकणारी २ मुले असा परिवार आहे.