सावंतवाडी :
कुणकेरी मुख्य रस्त्यापासून ३ किमी आत मध्ये असणारी सरुंदेवाडी, प्रत्येक पावसाळ्यात ओहोळावर पूल नसल्याने या वाडीचा गावाशी संपर्क तुटतो. १५० ते २०० लोकवस्ती असणाऱ्या वाडीवर जाताना पाळणेकोंड धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग वाहून जाण्याचा ओहळ मार्गात आडवा येतो. त्यामुळे पावसाळ्यातील ४ महिन्यामध्ये येथील दळणवळण पूर्णतः बंद होते. तसेच आजारी पडल्यास जेष्ठ नागरिकांना व जाग्यावर असणाऱ्या रुग्णांना खांद्यावरून उचलून आणावे लागते तसे आणण्यासाठी सुद्धा वाडीतील तरुण नोकरी निमित्त बाहेर असल्याने जेष्ठांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागते. ओहळापलीकडे आजूबाजूच्या ३-४ वाड्यांची शेती असल्याने ट्रॅक्टर घेऊन जाताना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. तसेच वाडीच्या शेवटच्या टोकाला श्री. देव उपरलकर यांचे जागरूक देवस्थान असल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची मोठी गैरसोय होते त्यांना गाडी मुख्य रस्त्याला लावून ५ किलोमीटर चा प्रवास पाई करावा लागतो. गणेशउत्सवाच्या वेळी गणेश मूर्ती नेताना धोकादायक पाण्यातून गाडी घालून धोका पत्करल्याशिवाय गणेश मूर्ती घरी नेण्याशिवाय दुसरा पर्याय येथील ग्रामस्थांना नाही.
पाळणेकोंड धरणाच्या सांडव्याचे पाणी भरून वाहतेवेळी किंवा आपत्कालीन विसर्ग करतेवेळी कोणतीही पूर्वसूचना देण्यात येत नसल्याने जीव धोक्यात घालून ये जा करणाऱ्या लोकांचा अपघात होऊन जीवितहानी देखील होऊ शकते.
पावसाळ्यानंतर सुद्धा धोकादायक ओहोळातून वाहतूक केल्याने बरेच अपघात घडले आहेत. मागील १५ ते २० वर्षे प्रत्येक निवडणुकीच्यावेळी प्रत्येक पक्षाच्या वचन नाम्यामध्ये या पुलाचा उल्लेख केला आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र काहीच होताना दिसत नाही. मतदानाच्या वेळी मतांचा जोगवा मागायला येणाऱ्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी तसेच आमदार खासदारांनी यामध्ये लक्ष घालून लोकांची कित्तेक वर्षाची पुलाची मागणी लवकरात लवकर पूर्ण करून द्यावी अशी माफक अपेक्षा या वाडीतील लोक व्यक्त करत आहेत.