You are currently viewing पहिला पाऊस

पहिला पाऊस

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी दीपक पटेकर यांचा अप्रतिम लेख

ग्रीष्मातील तप्त उन्हाच्या झळा…घामेजलेलं अंग आणि झाडांची साथ सोडून गळून पडणारी…वाऱ्यावर सळसळणारी पाने…इकडून तिकडे जलाचा शोधात भुर्रर्र उडणारी चिमणी पाखरे… जिव्हा बाहेर काढून उन्हाने कायली होताना पाण्यासाठी भटकणारे पशु…भेगाळलेली जमीन आणि कसणारे शेतकरी…हवालदिल होऊन वाट पाहत असतात मृगाच्या बरसणाऱ्या धारांची…हो, तोच पहिला पाऊस जो धरणी वर बरसताच मृदेचा गंध पसरतो वातावरणात…मन प्रसन्न करतो…अन् सृष्टीला न्हाऊ घालतो.
“पाऊस” अगदी हिवाळ्यात अंग-अंग रोमांचित करणारी गुलाबी थंडी असली…गारेगार हवेने अंगावर रोमांच उभे राहिले तरी…सर्वांग भिजवून…ओलेचिंब करणारा…हवाहवासा वाटणारा आवडता ऋतू म्हणजे… पावसाळा…!
पाऊस सुरू होताच…तप्त उन्हाच्या झळांनी तापलेली भुई…सुकलेली रानेवने… सुखावतात…सर्वत्र हिरवळ दिसू लागते…धरणी नवा साज लेवून नववधू सारखी सजते…जणू…

*वरून राजाच्या आगमनाने*
*अवघी धरणी ही सुखावली*
*मतरल्यागत हिरवळही मग*
*भुईतून डोकावून बघू लागली…*

खरंच पावसाचे मोत्यासारखे थेंब धरणीवर बरसतात आणि तप्त धरणीतून सुखाच्या वाफा हवेत विरु लागतात…मोसमातील पहिला पाऊस असाच बेधुंद होऊन बरसतो…कोसळतो डोंगर कपारीत…छोटे छोटे धबधबे प्रवाहित होऊन वाहतात… नाले, ओहोळ…दगड धोंड्यांना न्हाऊ घालत…आपटत..आदळत…आपल्या थंडगार निर्मळ जलाने जलाभिषेक करत दगड धोंड्यांच्या अंगावरील…मळ स्वच्छ करत जाऊन भेटतात…सरितेला…!
धुळीने माखलेलं… ओहोळ, नाल्यांचे गढूळ पाणी सरिता आपल्या कवेत सामावून घेते… सागराच्या भेटीच्या ओढीने सरिता वेगाने मोबाराच्या दिशेने धाव घेते… अन् आपण वाहवत आणलेल्या गढूळ पाणी, मळासहित विलसते सागराच्या कुशीत…!
पावसाच्या जलधारा अंगोपांगी भिजवून टाकतात झाडे, वेली, पान फुलांना…काळे काळे ढग जमतात अवकाशी…डोंगर पठारावर मयूर नाचतो फुलवित पिसारा… सांडतो मयूरपंख नादात नाचाच्या…अवकाशी काळे पांढरे ढग धावू लागतात एकमेकांशी स्पर्धा करत…वरुणाचा वेग वाढतो…ढगांची गट्टी जमते…एकमेकांना मिठ्या मारताच…जोराचा गडगडाट होतो…कानठळ्या बसविणारी…पाऊस येण्याची वर्दी देणारी गर्जना होते…पावसाच्या स्वागतासाठी…विजा फेर धरून नाचू लागतात…चकाकतात…चमकतात अवघे आकाश आपल्या लखलखाटाने उजळून टाकतात…हवेत गारवा पसरतो…अंगाला थंड हवेची झुळूक स्पर्शून जाते… अन्…पाऊस येण्याची चाहूल लागते…गडगडाट…लखलखाट सुरूच असतो…अन्…वाजत गाजत धुमधडाक्यात नव्या जोडप्याची वरात येते तसाच…पाऊस धरणीवर अवतरतो.
*मन पाऊस पाऊस… ओल्या मातीचा सुवास*
*मन चिंब चिंब भिजलं… आधी उन्हात शिजलं*
*मन गार गार झालं…पहिल्या पावसात न्हालं*
पहिला पाऊस…तनमन मोहून टाकतो…डोंगर पठारावर…मातीच्या ढिगाऱ्यावर, शेणीच्या माचावर…लाकडाच्या भाऱ्यांवर, विजेच्या तारांवर…झाडे, वेलींच्या पानावर, ओसरीच्या पायऱ्यावर…घराच्या छपरांवर, कौले फुटलेल्या पाऱ्यावर…शेताच्या मेरेवर, रुजणाऱ्या तरव्यावर…गवताच्या पातीवर, सुकलेल्या सड्यावर…सौंदर्यवतीच्या सौंदर्यावर, युवतीच्या यौवनावर..माणसांच्या मनावर…आतुरलेल्या तनांवर भुरळ पडून अडकून पडतो…
बालगोपाल…तरुण-तरुणीच्या कुन्तलांवर मोत्यासारखा चमकतो…
अंगणातील पाण्यात…मुलांची मस्ती सुरू होते…कागदाच्या होड्या…कुणी साध्या तर कुणी शिडाच्या होड्या पाण्यात सोडतो…जोरात जाण्याच्या नादात पाण्याला ढकलतो…भिजलेल्या कागदी होडीला तिथेच विराम लागतो…चिखलाच्या पाण्यात मनसोक्त खेळतो…जसा “दहा रुपयांचा सर्फ एक्सेल सर्व डाग काढून टाकतो…” तसेच…स्वच्छ होण्यासाठीच…! पावसाच्या पाण्यात धुरकटलेल्या रस्त्यावर छत्र्यांचा वावर वाढू लागतो… रेनकोट घालून जणू मोटारसायकली फिरू लागतात…गुरांच्या पाठीवर मायेने हात फिरवीत…पाठीवर कांबळी घेऊन बळीराजा भुई नांगरायला लागतो…मृगाच्या दिवशी पर्जन्यरायाला शेतात नैवेद्य दाखवतो…चिमण्या पाखरे घरट्यात पिल्लांना उबेस घेतात… मुंग्यांची वारुळे मात्र…पावसाच्या पाण्यात कोसळून पडतात…गाई, गुरे शिरशिरणाऱ्या अंगाने गोठ्याचा आधार शोधतात…
असं म्हणतात…पहिल्या पावसाच्या आगमनाने म्हातारी मनेही तरुण होतात…त्यांच्या मनातही मयूर नाचतात…खरंच…पाऊस अन् धरेच्या मिलनाने पसरलेला मृदेचा दर्प रंध्रारंध्रात घुसतो…आनंदलेली मने मृदेच्या दर्पाने अन् पहिल्या पावसाच्या आगमनाने मोहून…बहरून जातात…सृष्टी हिरवाईची शाल पांघरु लागते…तन मन ओलेचिंब होते…वरुणाचा नाजूक स्पर्शाने शहारून…प्रेमाची…मायेची उबदार रजई ओढून घेते….!

©[दीपि]
दीपक पटेकर, सावंतवाडी

प्रतिक्रिया व्यक्त करा