You are currently viewing विधवा महिलांसाठी कौशल्य प्रशिक्षणाचे नियोजन करावे

विधवा महिलांसाठी कौशल्य प्रशिक्षणाचे नियोजन करावे

विधवा महिलांसाठी कौशल्य प्रशिक्षणाचे नियोजन करावे

– जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी

कोविडकाळात विधवा झालेल्या महिलांसाठी आरसेटी आणि महिला बाल विकास विभागाने एक प्रशिक्षण आराखडा तयार करावा. त्यामध्ये महिलांना कोणत्या प्रकाराचा रोजगार उभारता येईल आणि त्यासाठी कोणत्या प्रकारचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे याचा विचार व्हावा अशा सूचना जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिल्या. सर्व बँकांच्या जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक आज संपन्न झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

            यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, नाबार्डचे अजय थुटे, रिझर्व बँकेचे नरेंद्र कुमार कोकरे, जिल्हा उद्योग केंद्राचे श्री. दामले व श्री. गावडे, आरसीटीचे संचालक राजाराम परब यांच्यासह जिल्ह्यातील विविध बँकांचे प्रतिनिधी व महामंडळांचे समन्वयक उपस्थित होते.

            सुरुवातीस जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक पी.के.प्रामाणिक यांनी जिल्ह्यातील बँकांच्या कामगिरीचा आढावा देताना जिल्ह्याच्या सीडी रेशो 50 टक्के असल्याचे सांगितले. पीक कर्ज वाटपामध्ये जिल्हा राज्यात अग्र क्रमांकावर असून सन 2021-22 मध्ये जिल्ह्यात 340 कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. प्राधान्य क्षेत्रात 1 हजार 153 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले असून हे प्रमाण दिलेल्या उद्दीष्टाच्या 64 टक्के आहे. तसेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात 151 टक्के काम झाले असून या योजनेंतर्गत जिल्ह्यात 212 प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. तर पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत 183 प्रकरणांमध्ये 4 कोटी 86 लक्ष रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले असल्याची माहिती दिली.

            जिल्ह्यातील बँका चांगले काम करत असून पीक कर्ज, प्राधान्य क्षेत्रातील वित्त पुरवठ्यामध्ये जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. बँकाच्या या कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन करून जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी म्हणाल्या, अग्रणी बँकेने नियमित आढावा घेऊन वित्त पुरवठा सुरळीत राहील यासाठी काम करावे. प्रधानमंत्री व मुख्यमंत्री रोजगार योजनांचे काम चांगले झाले आहे. पीक कर्जही चांगल्या प्रकारे वाटप होत आहे.

            यावेळी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट काम केलेल्या जिल्ह्यातील 10 बँकांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी यांच्या हस्ते बँक ऑफ इंडियाच्या वार्षिक कर्ज योजना पुस्तिका आणि आरसेटीच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा