You are currently viewing उजळु स्मृती कशाला

उजळु स्मृती कशाला

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच….लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती रायबागकर यांचा अप्रतिम ललितलेख*

*उजळु स्मृती कशाला*

शीर्षक- *ठाव भविष्याचा*

वैशाखवणवा पेटलाय चहुकडे…ग्रीष्माचा दाह पोळतोय तनाला…पण सुख-दुःखाच्या हिंदोळ्याबरोबर मनही का होतंय आंदोलीत? का मनसागरातील लाटा उसळताहेत वारंवार? काठोकाठ भरलेल्या भांड्याला किंचितसा धक्का लागल्यावर पाणी उचंबळून खाली सांडावं तसे हे विचार का पळताहेत इतस्ततः सैरावैरा? का टोचताहेत सगळे सल टोकदार शूल होऊन…का…का…का?

माझ्या अवघ्या भावविश्वाला व्यापून उरणारं व्यवधान नाहीसं झालं म्हणून? या भयाण रितेपणाच्या अवकाश-पोकळीत मन दोर टंतुटलेल्या पतंगाप्रमाणे भिरभिरतंय म्हणून? त्या ताज्या, दुःखद आठवणी पुन्हा पुन्हा डोकं वर काढताहेत म्हणून? की……स्वतःसाठी जगायचंच राहिलंय म्हणून?

पण मग आयुष्यभर ज्यांच्या सकारात्मक विचारांच्या सहवासात राहिलो त्याचं काय!
*सुखे दु:खे समे कृत्वा* ही शिकवण अजुनही मनावर बिंबलीच नाही आपल्या? प्रदीर्घ सहवास संपला तरी…? काय बरं सांगायचे ते…

*मन डोह आनंदाचा*
*राहो नितळ, निर्मळ*
*जैसे तरंगाविणे संथ* *जलाशयातील जळ*

पण हे भलत्याच आठवणींचे खडे का तरंग उठवताहेत त्या डोहात…

जेमतेम चार-पाच वर्षांच्या वयात आजीकडे शिकायला जावे लागल्यामुळे झालेली मनाची तगमग आणि परिस्थितीवश मुलालाही माझ्या आईकडे शिकायला पाठवावं लागलं…भूमिका बदलल्या तेव्हा कळलं…जावे त्याच्या वंशा…

भावंडांसोबत प्रेम-माया, वाद-संवाद, रुसणं-फुगणं…मनाला मुरड घालणं म्हणजे काय हे तेव्हाच कळलं…

जाणत्या-अजाणत्या वयाच्या
सीमेवरचं…गैरसमज होऊन ते दूर होण्याचे किंवा टिकवण्याचेही अल्लड वय…आणि त्यानंतर या जगातूनच निघून गेलेल्या दुरावलेल्या मैत्रिणीची सय किंवा बदलीमुळे दुरावलेल्या सखीला अजुनही शोधण्याची असोशी…

लग्नानंतर…’सासरी-आपलं घर समजून दुधातल्या साखरेप्रमाणे विरघळून जायचे’ या संस्कारांची शिदोरी घेऊन आल्यामुळे, लहान म्हणून सदैव आत्मसन्मानाची बऱ्याच पडझडीनंतरही तशीच राहिलेली अधुरी आस…कारण…

*झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा*

हे फक्त ऐकण्यापुरतंच…

जोडीदाराच्या लोण्याप्रमाणे मऊ, अबोल स्वभावामुळे सहन करावे लागणारे उपेक्षा आणि अपमानाचे घाव…त्यामुळे कोणाच्याही मानभावी वर्तन-जलाने न विझलेला, मनातच धुमसणारा सात्विक संतापाचा वन्ही…

मातृत्व लाभल्यानंतर…बाललीलांच्या निखळ आनंदात विसर पडलेल्या कष्टं, मुलांच्या वाढत्या वयातील पिढीच्या अंतरामुळे होणारी चहाच्या पेल्यातील वादळं, शारीरिक आणि मानसिक स्थित्यंतरं…एकटेपणाच्या भावनेने होणारी मूक घुसमट…

त्यांचे विवाह, संसार, नातवंडं…सृष्टी चक्राची आवर्तनं सुरूच…आणि त्यातच गुरफटून गेलेलं तन-मन…आणि ह्या काट्यांबरोबरच आनंदाचे गुलाबही फुललेच की कधीतरी…त्यांचा सुवास का दरवळत नाहीय मनगाभाऱ्यात?

*गुलाब फुलत नाही* *काट्यावाचून*
*जीवनात कधी सावली,*
*कधी ऊन*

हेही माहीत होतंच की…मग आता…?

*आता जगायचे ऐसे* *कमलपत्रावरी जैसा*
*थेंब मौक्तिक शोभतो* *देऊ-घेऊ मोद तैसा*

ते शरीराने दूर, न परतीच्या वाटेवर गेले असले तरी, माझ्या मनात तर सदैव राहणारच आहे त्यांची अमिट छबी…आठवण करून देत राहील ती मला सतत सकारात्मक विचारांची…तेव्हा उपटूनच टाकले पाहिजेत हे सर्व विद्ध करणारे बाण…मलमपट्टी केली पाहिजे निर्लेपाची, समताभावाची, साक्षेपाची…सुकर, सुलभ, सुसह्य अशा उर्वरित आयुष्यासाठी…

*अंतरातील साम्यजलाने*
*आनंद-कुसुमं फुलविणे*
*नको उदासीची छाया*
*स्व-रंगात रंगुन जाणे*

त्यासाठी…

*मन टोपली केराची*
*आधी करीन रिकामी*
*जैसे स्वच्छ ठेवे घर*
*अंतर्बाह्य, अंतर्यामी*

नुसत्या विचारांनी सुद्धा कित्ती हलकं वाटतंय पीसासारखं…ठरलं तर…

*गतकाळातील घटना*
*प्राक्तन म्हणावे त्याला*
*भविष्याचा घेईन ठाव*
*उजळु स्मृती कशाला!*

शब्द-३९७

लालित्य नक्षत्रवेल समूह आयोजित
स्पर्धेसाठी
ललितलेखन
विषय- *उजळु स्मृती कशाला*

भारती महाजन-रायबागकर

शीर्षक- *ठाव भविष्याचा*

वैशाखवणवा पेटलाय चहुकडे…ग्रीष्माचा दाह पोळतोय तनाला…पण सुख-दुःखाच्या हिंदोळ्याबरोबर मनही का होतंय आंदोलीत? का मनसागरातील लाटा उसळताहेत वारंवार? काठोकाठ भरलेल्या भांड्याला किंचितसा धक्का लागल्यावर पाणी उचंबळून खाली सांडावं तसे हे विचार का पळताहेत इतस्ततः सैरावैरा? का टोचताहेत सगळे सल टोकदार शूल होऊन…का…का…का?

माझ्या अवघ्या भावविश्वाला व्यापून उरणारं व्यवधान नाहीसं झालं म्हणून? या भयाण रितेपणाच्या अवकाश-पोकळीत मन दोर तुटलेल्या पतंगाप्रमाणे भिरभिरतंय म्हणून? त्या ताज्या, दुःखद आठवणी पुन्हा पुन्हा डोकं वर काढताहेत म्हणून? की……स्वतःसाठी जगायचंच राहिलंय म्हणून?

पण मग आयुष्यभर ज्यांच्या सकारात्मक विचारांच्या सहवासात राहिलो त्याचं काय!
*सुखे दु:खे समे कृत्वा* ही शिकवण अजुनही मनावर बिंबलीच नाही आपल्या? प्रदीर्घ सहवास संपला तरी…? काय बरं सांगायचे ते…

*मन डोह आनंदाचा* *राहो नितळ, निर्मळ*
*जैसे तरंगाविणे संथ* *जलाशयातील जळ*

पण हे भलत्याच आठवणींचे खडे का तरंग उठवताहेत त्या डोहात…

जेमतेम चार-पाच वर्षांच्या वयात आजीकडे शिकायला जावे लागल्यामुळे झालेली मनाची तगमग आणि परिस्थितीवश मुलालाही माझ्या आईकडे शिकायला पाठवावं लागलं…भूमिका बदलल्या तेव्हा कळलं…जावे त्याच्या वंशा…

भावंडांसोबत प्रेम-माया, वाद-संवाद, रुसणं-फुगणं…मनाला मुरड घालणं म्हणजे काय हे तेव्हाच कळलं…

जाणत्या-अजाणत्या वयाच्या
सीमेवरचं…गैरसमज होऊन ते दूर होण्याचे किंवा टिकवण्याचेही अल्लड वय…आणि त्यानंतर या जगातूनच निघून गेलेल्या दुरावलेल्या मैत्रिणीची सय किंवा बदलीमुळे दुरावलेल्या सखीला अजुनही शोधण्याची असोशी…

लग्नानंतर…’सासरी-आपलं घर समजून दुधातल्या साखरेप्रमाणे विरघळून जायचे’ या संस्कारांची शिदोरी घेऊन आल्यामुळे, लहान म्हणून सदैव आत्मसन्मानाची बऱ्याच पडझडीनंतरही तशीच राहिलेली अधुरी आस…कारण…

*झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा*

हे फक्त ऐकण्यापुरतंच…

जोडीदाराच्या लोण्याप्रमाणे मऊ, अबोल स्वभावामुळे सहन करावे लागणारे उपेक्षा आणि अपमानाचे घाव…त्यामुळे कोणाच्याही मानभावी वर्तन-जलाने न विझलेला, मनातच धुमसणारा सात्विक संतापाचा वन्ही…

मातृत्व लाभल्यानंतर…बाललीलांच्या निखळ आनंदात विसर पडलेल्या कष्टं, मुलांच्या वाढत्या वयातील पिढीच्या अंतरामुळे होणारी चहाच्या पेल्यातील वादळं, शारीरिक आणि मानसिक स्थित्यंतरं…एकटेपणाच्या भावनेने होणारी मूक घुसमट…

त्यांचे विवाह, संसार, नातवंडं…सृष्टी चक्राची आवर्तनं सुरूच…आणि त्यातच गुरफटून गेलेलं तन-मन…आणि ह्या काट्यांबरोबरच आनंदाचे गुलाबही फुललेच की कधीतरी…त्यांचा सुवास का दरवळत नाहीय मनगाभाऱ्यात?

*गुलाब फुलत नाही काट्यावाचून*
*जीवनात कधी सावली,कधी ऊन*

हेही माहीत होतंच की…मग आता…?

*आता जगायचे ऐसे कमलपत्रावरी जैसा*
*थेंब मौक्तिक शोभतो* *देऊ-घेऊ मोद तैसा*

ते शरीराने दूर, न परतीच्या वाटेवर गेले असले तरी, माझ्या मनात तर सदैव राहणारच आहे त्यांची अमिट छबी…आठवण करून देत राहील ती मला सतत सकारात्मक विचारांची…तेव्हा उपटूनच टाकले पाहिजेत हे सर्व विद्ध करणारे बाण…मलमपट्टी केली पाहिजे निर्लेपाची, समताभावाची, साक्षेपाची…सुकर, सुलभ, सुसह्य अशा उर्वरित आयुष्यासाठी…

*अंतरातील साम्यजलाने*
*आनंद-कुसुमं फुलविणे*
*नको उदासीची छाया*
*स्व-रंगात रंगुन जाणे*

त्यासाठी…

*मन टोपली केराची*
*आधी करीन रिकामी*
*जैसे स्वच्छ ठेवे घर*
*अंतर्बाह्य, अंतर्यामी*

नुसत्या विचारांनी सुद्धा कित्ती हलकं वाटतंय पीसासारखं…ठरलं तर…

*गतकाळातील घटना*
*प्राक्तन म्हणावे त्याला*
*भविष्याचा घेईन ठाव*
*उजळु स्मृती कशाला!*

शब्द-३९७

प्रतिक्रिया व्यक्त करा