सुरक्षितरित्या सोडले नैसर्गिक अधिवासात
मालवण :
सिंधुदुर्ग वनविभागाने रविवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान धामापूर(ता.मालवण) पेठवाडीत विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला सुरक्षितरित्या नैसर्गिक अधिवासात सोडले. भक्ष्याच्या शोधात असलेला हा कोल्हा सुशीलकुमार घाडी यांच्या घरालगत दिनेश काळसेकर यांच्या विहीरीत पडला. कुडाळ वनपरिक्षेत्रचे रेस्क्यू पथकाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत १५ ते २० फूट खोल विहिरीतून त्याला बाहेर काढले.
भक्ष्याच्या मागे धावताना अंदाज न आल्याने कठडा नसलेल्या या विहिरीत कोल्हा पडला असावा असे वनपरिक्षेत्र अधिकारी अमृत शिंदे म्हणाले.
सुमारे ४ ते ५ फूट पाण्याची पातळी असलेल्या या विहिरीत कोल्ह्याने बिळ केले होते. तो पाण्याबाहेर येताच अथक प्रयत्नाने त्यास पिंजऱ्यात घेण्यात वनविभागाच्या पथकास यश आले.
शिंदे म्हणाले, ग्रामस्थांनी वनविभागाला वेळीच माहिती दिली. बचाव कार्यास देखील मदत केली.त्यामुळे या सोनेरी कोल्ह्याचा जीव वाचवता आला.
पशुवैद्यकीय अधिकारी यांनी वैद्यकीय तपासणी केल्यानंतर कोल्ह्याला नैसर्गिक अधिवासात मूक्त करण्यात आले .
हा वन्यप्राणी सोनेरी कोल्हा या प्रजातीत मोडतो. प्रभारी उपवनसंरक्षक दीपक खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ वनपरिक्षेत्र अधिकारी अमृत शिंदे , वनपाल मालवण श्रीकृष्ण परीट, वनरक्षक धामापूर शरद कांबळे, वाहनचालक राहुल मयेकर यांनी स्थानिक ग्रामस्थ सुशील घाडी, बाळकृष्ण घाडीगावकर, दिनेश काळसेकर, तेजस वालावलकर, चेतन काळसेकर यांच्या मदतीने कोल्ह्याला जीवदान देण्यास यश आले.