जगण्याचे आर्त’ काव्यसंग्रह प्रकाशनप्रसंगी इंदुमती जोंधळे यांचे प्रतिपादन
कणकवली
कवी विजय सावंत यांची प्रभा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘जगण्याचे आर्त’ कविता संग्रहामधील समग्र कविता माणूसपणाला भिडताना भवतालच्या आक्रमणावर प्रहार करते. शेत -शिवार अबाधित राहू दे, माणसाने माणसाचेच गीत गाऊ दे…अशी प्रार्थनाही करते. यामुळे कवी सावंत यांची कविता खऱ्या अर्थाने आजच्या जगण्याचे अनुभव मांडते असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका इंदुमती जोंधळे (पुणे) यांनी सिंधुदुर्गातील कवी विजय सावंत ( कुंब्रल) यांच्या ‘जगण्याचे आर्त’ या काव्यसंग्रह प्रकाशनाच्या प्रसंगी केले
‘जगण्याचे आर्त’ हा काव्यसंग्रह कणकवलीच्या प्रभा प्रकाशनाने प्रसिद्ध केला असून त्याचे प्रकाशन समाज साहित्य संघटना सिंधुदुर्गतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन कार्यक्रमात श्रीमती जोंधळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना श्रीमती जोंधळे यांनी ज्ञानेश्वरांनी त्या काळात पसायदान लिहिलेले परंतु विश्वासाठी प्रार्थना गाणारी ही कविता म्हणजे आजच्या काळाचे पसायदानच आहे असेही आग्रहाने सांगितले. ज्येष्ठ बाललेखक एकनाथ आव्हाड, कवयित्री प्रमिता तांबे आणि विजय सावंत यांनी ‘जगण्याचे आर्त’वर भाष्य केले. यावेळी समाज साहित्य संघटनेचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर इतर पदाधिकारी वैभव साटम, मनीषा पाटील, नीलम यादव, प्रियदर्शनी पारकर, तुषार नेवरेकर, संतोष जोईल आदी उपस्थित होते.
एकनाथ आव्हाड म्हणाले,विजय सावंत यांच्या ‘जगण्याचे आर्त’ मधील कविता समाजाच्या भावनिक ,मानसिक अशा खोल आर्ततेचे यथार्थ दर्शन घडते. त्यांची एकूण कविता ही, देव, देश धर्म, माणूस – माणूसकी आणि नातेसंबंधातील वेदना याबद्दल पोटतिडीकीने बोलते.
प्रमिता तांबे म्हणाल्या, कवी सावंत हे अनेक वर्ष निष्ठेने काव्यलेखन करत असून त्यांच्या कविता लेखनाचा आलेख उंचावत गेल्याचे प्रतिबिंब त्यांच्या ‘जगण्याचे आर्त’ काव्यसंग्रहा मध्ये दिसते. माणसाबद्दलची ओढ आणि माणूस एक असल्याची आस याच्या केंद्रस्थानी असलेली ही कविता म्हणूनच समाजकारण, राजकारण आणि संस्कृतीकरण या सगळ्यावर बोचरी टीका करते. मानवी संवेदनांची ओढ हा या कवितेचा महत्त्वाचा गाभा आहे.
श्री मातोंडकर म्हणाले, ‘जगण्याचे आर्त’ हा देखणा काव्यसंग्रह असून तो इंदुमती जोंधळे यांच्यासारख्या मोठ्या लेखिकेच्या हस्ते प्रकाशित होत आहे ही अपूर्व अशी घटना आहे. समाज साहित्य संघटना नव्या लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी सतत असे विविध उपक्रम राबवत असते.वैभव साटम यांनी सूत्रसंचालन केले.मनीषा पाटील यांनी आभार मानले.