You are currently viewing 15 जून रोजी उद्यमिता यात्रा सिंधुदुर्गात 3 दिवसीय व्यवसायाभिमूख प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

15 जून रोजी उद्यमिता यात्रा सिंधुदुर्गात 3 दिवसीय व्यवसायाभिमूख प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी

कोरोनाचे संकट सरल्यानंतर महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीतर्फे आता राज्यातील लघु व्यवसाय सुरु करण्याची ईच्छा असणाऱ्यांना मदत आणि मार्गदर्शन करण्यात येत आहे. या कामी राज्य स्तरावर राज्यातील विविध स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने युथ अँड फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने युथ अँड फाउंडेशनने राज्यभर उद्यमिता यात्रेचे आयोजन केले आहे. ही उद्यमिता यात्रा दि. 15 जून 2022 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहे. या यात्रेच्या निमित्ताने दि. 15 ते 17 जून या कालावधीत व्यवसायाभिमूख प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सहभागासाठी दि. 14 जूनपर्यंत संपर्क करण्याचे आवाहन कौशल्य विकास विभागातर्फे करण्यात आले आहे.

            जिल्ह्याच्या या यात्रेच्या नियोजन आणि अंमलबजावणीची जबाबदारी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण कला व शिक्षण विकास संस्था या संस्थेने स्वीकारली आहे. दि. 10 मे 2022 रोजी मुंबई येथून या उद्यमिता यात्रेला सुरुवात झाली आहे. दि. 15 जून 2022 रोजी  सिंधुदुर्ग येथे या यात्रेचे आगमन होणार आहे. कुडाळ येथील पंचायत समितीच्या सभागृहामध्ये जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग कार्यालय सिंधुदुर्ग इ. सि. शेख यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली या यात्रेचा शुभारंभ कार्यक्रम होणार आहे.

            दि. 15 ते 17 जून 2022 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे 100 नव व्यवसायिकांसाठी कुडाळ पंचायत समितीच्या  सभागृहामध्ये अनिवासी 3 दिवसीय व्यवसायाभिमुख प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण विनामूल्य असून प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

            नव व्यवसायीकांसाठी बीज भांडवलासाठी मदत करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. संपूर्ण जिल्ह्यातून प्रथम नाव नोंदणी करणाऱ्या केवळ 100 प्रशिक्षर्थिनाच या संधीचा लाभ घेता येणार आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी दयानंद कुबल (कोकण कला व शिक्षण विकास संस्था) यांच्याशी ८७८८५८३६३७/ ८२७५७७३६५० या भ्रमणध्वनीवर दिनांक 14 जून पूर्वी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा