सावंतवाडी
दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे मडुरा शाखेचे व्यवस्थापन सम्राट दिगंबर मुंज (४८) रा.गवळीतिठा-सावंतवाडी, यांचे आज उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्यावर गोवा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. इन्सुली घाटीत झालेल्या दुचाकी अपघातात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना गोवा येथे हलविण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
सम्राट मुंज हे बुधवार १ जून रोजी सायंकाळी बँकेचे कामकाज आटोपून घरी जात असताना इन्सुली मेटात ते दुचाकीवरुन रस्त्यावर कोसळून अपघात झाला होता. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी मणिपाल रुग्णालयात दाखल केले होते. त्यांची प्रकृती उपचारांना हवी तशी साथ देत नव्हती. अखेर आज दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सम्राट मुंज हे १५ वर्षांपूर्वी जिल्हा बँकेत रुजू झाले होते. आठ वर्षांपूर्वी त्यांची मळगाव शाखेत शाखा व्यवस्थापक पदावर बढती झाली होती. गेली चार वर्षे ते मडुरा शाखेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. शांत, प्रामाणिक व मृदू स्वभावामुळे त्यांची ग्राहकप्रिय व्यवस्थापक म्हणून ओळख होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, भाऊ असा परिवार आहे.