वेंगुर्ले
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोकणातील शेतकऱ्यांसाठी १०० टक्के अनुदानाखाली फलोत्पादन योजना राबविली. तसेच महिलांना आरक्षण धोरण राबविल्याने महिलांची उन्नत्ती झाली आहे. दरम्यान पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त १० ते १६ जून या कालावधीत वेंगुर्ले शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश सचिव तथा माजी नगराध्यक्षा नम्रता कुबल यांनी वेंगुर्ले येथे दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचा २३ वा वर्धापन दिन वेंगुर्ले शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय येथे साजरा करण्यात आला. यावेळी नम्रता कुबल बोलत होत्या. यावेळी वेंगुर्ले शहराध्यक्ष सत्यवान साटेलकर, माजी जिल्हा बँक संचालक प्रज्ञा परब, जिल्हा कार्यकारिणी सदस्य नितीन कुबल, डॉकटर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.संजीव लिंगवत, महिला शहर अध्यक्ष सुप्रिया परब, शहर कार्यकारिणी सदस्य बावतीस डिसोजा आदी पदाधिकारी उपस्थित होते.
१० ते १६ जून या कालावधीत वेंगुर्ले शहर काँग्रेसतर्फे ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे समाजपयोगी कार्य याबाबत व्याख्यान, शहरात वृक्षारोपण व वृक्षवाटप व विविध समाजपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत,असे शहराध्यक्ष सत्यवान साटेलकर व नितीन कुबल यांनी सांगितले.