-कोकण पर्यटन विकास महामंडळ उपाध्यक्ष संदेश पारकर यांची सिंधुदुर्ग मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मागणी
छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत असुन छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची महती सर्वांना अनुभवता यावी यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक होणे आवश्यक आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील एकमेव पर्यटन जिल्हा असुन अजुनही जिल्ह्यात शिवरायांचे एकही भव्य स्मारक झालेले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासीक वारसा जपुन शिवरायांचे विचार आणि त्यांच्या शौर्याची महती अनुभवता यावी यासाठी कणकवली शहरात महाराष्ट्र शासनाच्या जागेत छत्रपतींचे भव्य स्मारक उभारावे अशी मागणी कोकण पर्यटन विकास महामंडळाच्या उपाध्यक्ष श्री.संदेश पारकर यांनी सिंधुदुर्गचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.प्रजित नायर यांच्याकडे केली.
कणकवली शहर हे जिल्ह्याचे केंद्रबिंदू असुन कणकवली शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. कणकवली शहरात महाराष्ट्र शासनाच्या मालकीची 23 गुंठे जागा आहे. त्यापैकी अंदाजे 6 ते 7 गुंठे जागा हायवे बाधित झाली आहे. यापूर्वी या जागेचा जिल्हा परिषद बांधकाम विभाग कार्यालय व जि.प. उपअभियंता निवासस्थान यासाठी वापर होत होता. त्यानंतर महाराष्ट्र शासनाकडे कणकवली पंचायत समितीकडून नूतन इमारतीसाठी ५ कोटींचा निधी उपलब्ध करुन द्यावा असा प्रस्ताव गेला. या प्रस्तावाला मंजुरी मिळुन निधी उपलब्ध होऊन आज ईमारत देखील पुर्ण होऊन नवीन संकुलात स्थलांतर झाले आहे. ज्या उद्देशासाठी महाराष्ट्र शासनाची २३ गुंठे जागा आरक्षित होती ते उद्दिष्ट या नवीन संकुलामुळे पुर्ण झाले आहे. यामुळे आता हि जागा रिकामी झालेली आहे.
गेली कित्येक वर्षे कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्त्यावर आहे. शिवप्रेमींनी या निवेदनाद्वारे अशी मागणी केली आहे की, सदरची जागा आपल्या ताब्यात घेवुन शिवरायांच्या पुतळ्याचे स्थलांतर महाराष्ट्र शासनाच्या ताब्यातील जागेत करावे. या जागी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्यदिव्य अश्वारुढ पुतळा उभारावा. तसेच छत्रपतींची शौर्यगाथा उलगडणारे व शिवरायांचा प्रेरणादायी इतिहास व महती अनुभवता येणारे ऐतिहासीक संकुल उभारण्यासाठी भरघोस निधीची तरतुद करावी अशी मागणी देखील संदेश पारकर यांनी केली.