अपघाताची शक्यता; मात्र संबंधित प्रशासनाला गांभीर्य नसल्याने नागरिकांमधून नाराजी…
सावंतवाडी
माजगाव-मोरडोंगरी परिसरात सावंतवाडी-शिरोडा मार्गावर गॅस पाईपलाईनसाठी खोदण्यात आलेले चर धोकादायक बनत आहेत. अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला घालण्यात आलेला भराव खचला असून माती रस्त्यावर आली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी भर पावसाळ्यात अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मात्र याबाबत संबंधित प्रशासनाला कोणतेही गांभीर्य नसल्याने वाहनधारक व नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
महिन्याभरापूर्वी सावंतवाडी शिरोडा मार्गावर माजगाव-मोरडोंगरी परिसरात एका खाजगी कंपनी कडून गॅस पाईपलाईनसाठी चर खोदण्यात आले. त्यावेळी या कामाला अनेकांनी विरोध केला होता. तशातच हे चर खोदून पाईपलाईन टाकून झाल्यानंतर त्यावर मातीचा भरावं ओढण्यात आला. मात्र पावसाळ्याला सुरुवात होताच ही माती खचली आहे. तर पावसाच्या पाण्यासोबत काही माती रस्त्यावर आली आहे. त्यामुळे भर पावसात त्या ठिकाणी एखाद्या वाहनाला अपघात होऊ शकतो. असे असताना देखील संबंधित प्रशासनाला कोणतेही गांभीर्य नसल्याने वाहनधारकांसह नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.