इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी नगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडील टँकर पुरवणे कामातील घोटाळ्याची चौकशी होवून संबंधीत दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी माजी नगरसेवक शशांक बावचकर यांनी प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
इचलकरंजी नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील सार्वजनिक शौचालये, स्वच्छतागृह व पे अँड यूज शौचालय साफसाईसाठी टँकर पुरवणे कामाची निविदा काढली होती. या कामाची अंदाजपत्रकीय रक्कम २७ लाख ३३ हजार ८६४ रुपये होती. ही निविदा ५ टक्के जादा दराने मक्तेदार कांबुरे यांना मंजूर झाली. या कामाचे कार्यादेश २७ जुलै २०१८ रोजी देण्यात आले होते. मुदत संपल्यानंतर संबंधित मक्तेदाराला शेकडा १.०८ कमी दराने मुदतवाढ देण्याचा ठराव स्थायी समितीमध्ये करण्यात आला होता. त्यानंतर २७ नोव्हेंबर २०२१ रोजी त्याबाबतचे कार्यादेश देण्यात आले होते. ही मुदत संपल्यानंतर नवीन निविदा प्रक्रिया राबविण्याच्या प्रस्तावाला
मुख्याधिका-यांनी २१ जानेवारी २०२२ रोजी मान्यता दिली. त्यास अनुसरून अंदाजपत्रकीय रक्कम २१ लाख १२ हजार ७५० या रकमेच्या निविदा मागविण्यात आल्या होत्या. या निविदांमध्ये चार मक्तेदारांनी सहभाग घेतला होता. त्यात मक्तेदार कांबुरे यांची अंदाजपत्रकाच्या रकमेपेक्षा २०.५ सर्वात कमी दराची निविदा प्राप्त झाली होती. मात्र आरोग्य विभागाने संबंधीत मक्तेदाराला कामाची समज, करारपत्र, कार्यादेश आदी पुढील प्रक्रिया केली नाही.
इचलकरंजी शहरात सध्या ७१ सार्वजनिक शौचालय, ११९ सार्वजनिक स्वच्छतागृह, १९ फिरते शौचालय साफसफाई केले जातात की नाही, साफसफाई होत असेल तर कोणत्या कार्यादेशाद्वारे केली जाते, निविदा प्रक्रिया नेमकी राबवली गेली का याबाबत स्पष्टता होत नसून यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा असण्याची शक्यता माजी नगरसेवक शशांक बावचकर यांनी व्यक्त केली असून पालिकेला दरवर्षी सुमारे ११ लाखांचे नुकसान होत असल्याचाही आरोप केला आहे.तसेच इचलकरंजी नगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडील टँकर पुरवणे कामातील घोटाळ्याची चौकशी होवून संबंधीत दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांच्याकडे त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.